

Cold weather increases; minimum temperature at 13 degrees
गंगापूर, पुढारी वृत्तसेवा : डिसेंबर महिन्याची सुरुवात होताच गंगापूर तालुक्यातील तापमानात लक्षणीय घट पाहायला मिळत आहे. गेल्या २ दिवसांपासून वातावरणात अचानक गारवा वाढला असून, पहाटेची बोचरी थंडी नागरिकांना जाणवू लागली आहे. पहाटे तापमान तब्बल १३ अंशांपर्यंत घसरत आहे.
गंगापूर शहर व तालुक्यात अचानक पडलेल्या थंडीनंतर सायंकाळी तसेच सकाळच्या वेळी नागरिक ठिकठिकाणी शेकोट्या पेटवताना दिसून आले. बदलत्या हवामानामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आजारी पडण्याचा धोका वाढला आहे. मागील महिन्यात उष्ण तेनंतर काही दिवस गारवा जाणवल्यानंतर गत आठवड्यात पुन्हा उकाड्याची चाहूल लागली होती. मात्र दोन दिवसांपासून पुन्हा तापमानात घट होत असून, हवामानातील या बदलामुळे सर्दी, ताप, खोकला, श्वसनाचे आजार वाढण्याची शक्यता डॉ. राजेश गुडदे यांनी व्यक्त केली आहे.
लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दमा, अॅलर्जी असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले. थंडीपासून बचावासाठी सकाळ, संध्याकाळी बाहेर पडताना स्वेटर, शाल, जॅकेट, हातमोजे, पायमोजे वापरावेत. व्यायाम, जॉगिंग करताना उबदार कपड्यांचा वापर करावा. गूळ, तीळ, शेंगदाणा यासारखे हिवाळ्यातील पौष्टिक पदार्थ आहारात घ्यावेत. त्वचा कोरडी पडत असल्यास क्रीम व मॉइश्चरायझर नियमित लावावे. थंड पाणी व शीतपेय टाळावीत. तसेच लहान मुलांनी सकाळी लवकर घराबाहेर जाण्याचे टाळावे, असा सल्ला डॉ. रवींद्र ठवाळ यांनी दिला.
गुलाबी थंडीची चाहूल
शेतांमध्ये दवबिंदूंचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. मागील ८ दिवसांपूर्वी थंडीचा जोर कमी झाला होता. परंतु, दोन दिवसांपासून बऱ्यापैकी थंडी वाढली आहे. तर गहू, हरभरा, मका या पिकांसाठी थंडी पोषक ठरणार आहे. दरम्यान, अधिक थंड वातावरणाचा प्रभाव पिकांवर ही दिसून येत आहे. पुढील काही दिवस तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
शेकोट्या पेटल्या
थंडीचा जोर पुन्हा वाढू लागला आहे सायंकाळी सहा वाजून पासूनच थंडी जाणून लागते यामुळे गावात ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. या शेकोट्याभोवती गर्दी होत आहे.