

Electricity Theft Worth ₹4.5 Lakhs: Cases Registered Against 47 Individuals
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : गंगापूर तालुक्यातील विविध गावांत महावितरणने राबवलेल्या धडक मोहिमेत ४७ जण वीज चोरी करताना आढळले. मात्र वीज चोरीची बिले भरण्यास टाळाटाळ केल्याने त्यांच्याविरुद्ध चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. महावितरणच्या या कारवाईमुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहे.
गंगापूर तालुक्यातील जांभाळा, टाकळी कदिम, टाकळीवाडी आणि वरझडी तसेच माळीवाडा, फतियाबाद, पेकलवाडी, इस्माइलपूर, आसेगाव, अंबेगाव, खोजेवाडी भागातील सुमारे ४७ जणांनी सुमारे साडेचार लाखांची वीज चोरी केल्याचे तपासणीत समोर आले. काहींनी आकडे टाकून तर काहींनी मीटरमध्ये फेरफार करून वीज चोरी केल्याचे समोर आले.
गुन्हे दाखल
या ४७ जणांनी वीज चोरीची निर्धारित बिले व तडजोड शुल्क न भरल्याने महावितरणने त्यांच्याविरुद्ध तक्रार दिली. या तक्रारीवरून वरील ४७ जणांविरुद्ध अनुक्रमे चिकलठाणा व छावणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.