

सिल्लोड : निवडणूक कामात हयगय करणाऱ्या सोळा कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. यात महसूलचे पाच तर विविध विद्यालयांच्या अकरा शिपायांचा समावेश आहे. नोटीसचा खुलासा आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी नीलेश अपार यांनी दिली. दरम्यान सोळा जणांना नोटीस बजावल्याने कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
नोटीस बजावलेल्यात ग््रााम महसूल अधिकारी नंदू बन्सवाल, जयंत घोडके, सहायक महसूल अधिकारी रवींद्र राजपूत, महसूल सेवक रघुनाथ फरकाडे, नबी शहा या महसूल कर्मचाऱ्यांसह शिपाई भगवान वाघ (महात्मा फुले विद्यालय, उपळी), नंदकिशोर भोसले (भूमी अभिलेख कार्यालय, सिल्लोड), कैलास हावळे (राष्ट्रमाता इंदिरा गांधी कन्या विद्यालय, सिल्लोड), सुरेश चव्हाण (छत्रपती शिवाजी विद्यालय, सिल्लोड), आबा गावंडे (महात्मा गांधी विद्यालय, अन्वी), सुनील सिरसाठ (रनेश्वर विद्यालय, हट्टी), संतुकराव मोरे (नेताजी सुभाषचंद्र विद्यालय, बाळापूर), संजय बसुरे (नॅशनल मराठी हायस्कूल, डोंगरगाव), जितेंद्र बुरकुले (सरस्वती भवन विद्यालय, भराडी), प्रेमा गुजराथी (नगरपरिषद, सिल्लोड) यांना नोटीस बजावण्यात आल्या आहे.
5 फेबुवारीला होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी गुरुवारी (दि. 29) शहरालगत असलेल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ईव्हीएम मतदान यंत्रे सिलिंग करण्यात आले. याकामी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. गुरुवारी सकाळी 7 वाजता हजर राहण्याचे कळवलेले होते. तर सकाळी 9 वाजेपर्यंत वरील कर्मचाऱ्यांना हजर राहणे आवश्यक होते. मात्र हजेरी दरम्यान वरील कर्मचारी नेमून दिलेल्या ठिकाणी हजर झाले नाही. यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी नीलेश अपार यांनी निवडणूक कामात हयगय केल्याप्रकरणी वरील सोळा कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
निवडणूक कामात हयगय करणाऱ्या सोळा कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. नोटीसचा खुलासा आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल. निवडणूक कामात कुणी हयगय केली, तर कुणाचीही गय केली जाणार नाही. नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी.
नीलेश अपार, निवडणूक निर्णय अधिकारी,