

हतनूर - कन्नड तालुक्यातील हतनूर परिसरात बेकायदेशीररीत्या देशी दारूची वाहतूक आणि चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने मद्यसाठा ठेवणाऱ्या तीन आरोपींवर ग्रामीण सपोनि डॉ. रामचंद्र पवार, बिट अंमलदार कैलास करवंदे,शिवदास बोराडे,अथय मोतिंगे यांनी सापळा रचून कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिसांनी वाहनासह सुमारे पाच लाख तेवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
दि. २९ नोव्हेंबर रोजी रात्री साडे नऊ वाजता तालुक्यातील हतनूर पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर, कमानीजवळ पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपी मनोज चंपकलाल जैस्वाल रा. गल्लेबोरगाव, (ता. खुलताबाद) सुनील अण्णा देहाडे रा. पिंपरी, (ता. खुलताबाद) दिलीप चंपकलाल जैस्वाल, देशी दुकानदार रा. गल्लेबोरगाव (ता. खुलताबाद) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावेळी अशोक लेलँड वाहन एम एच२० इएल-३८९१ किमत ५ लाख, देशी दारू भिंगरी संत्रा ९६ काचेच्या बाटल्या किमत ७६८०रुपये, ९० मिली च्या ३८४ प्लास्टिक बाटल्या किमत १५,३६०, मुद्देमाल मिळून आला. आरोपींकडे कोणत्याही प्रकारचा परवाना नसताना त्यांनी दारूचा साठा आपल्या ताब्यात ठेवून वाहनातून चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक केली. तसेच परवाना धारक दुकानातून बेकायदेशीररीत्या दारू पुरवठा झाल्याचेही निष्पन्न झाले. त्यामुळे सर्व आरोपींवर मद्यनिषेध कलम ६५(इ) हा गुन्हा नोंदविण्यात आला असून सपोनि रामचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास एस.बी. बोराडे हे करीत आहेत.