

Drunk man murders friend, one arrested, other absconding
गंगापूर, पुढारी वृत्तसेवा: गंगापूर तालुक्यातील भिवधानोरा शिवारात मंगळवारी (दि. १६) सायंकाळी ५.३० वाजता युवकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणी दोन संशयित मित्रांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
राहुल रमेश नवथर (३५, रा. गळनिंब) असे मयताचे नाव असून, कानिफनाथ मावस व योगेश कल्याण नाग यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुल नवथर सोमवारी दुपारी कानिफनाथ मावस व योगेश कल्याण नागे या मित्रांसोबत भिवधानोरा शिवारातील गट क्र. ३०६ मधील शेतात दारू पिण्यास बसला होता. नशेत असतानाच किरकोळ वाद झाला. मावस व नागे यांनी गावठी कट्ट्यातून राहुलवर सलग तीन गोळ्या झाडल्या. एक गोळी बरगडीत, दुसरी खांद्यावर तर तिसरी पोटात लागली. गंभीर जखमी झालेल्या राहुलचा जागीच मृत्यू झाला.
संध्याकाळी शेतकरी नारायण चव्हाण शेतात गेले असता रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात पडलेला युवकाचा मृतदेह दिसून आला. त्यांनी पोलिस पाटील शिवाजी तांगडे यांना माहिती दिली. त्यानंतर गंगापूर पोलिस ठाण्याचे सपोनि विठ्ठल झांजुर्णे, उपनिरीक्षक औदुंबर म्हस्के, गुन्हे शाखेचे अधिकारी, ठसेतज्ञ व श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी तीन ग्लास दिसून आले. पंचनामा करून महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले. या घटनेनंतर संशयित आरोपी मावस व नागे घटनास्थळावरून पसार झाले. मात्र, गुप्त बातमीदाराच्या मदतीने पोहेका संदीप राठोड, विजय नागरे व अनिरुद्ध शिदे यांनी नेवासा फाट्याजवळ पहाटे सापळा रचून आरोपी योगेश नागेला जेरबंद केले. दुसरा आरोपी कानिफनाथ मावस अद्याप फरार असून, त्याने मोबाईल बंद करून पोलिसांना चकवा दिला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
राहुल नवथर पूर्वी मुंबई येथे महावितरणमध्ये वायरमन म्हणून कार्यरत होता. तीन वर्षांपूर्वी नोकरी सोडून तो गळनिंब येथे राहत होता. हत्येमागे पूर्ववैमनस्य असावे, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पावसामुळे तपासात काही प्रमाणात अडथळा आला असला तरी मृतदेह फॉरेन्सिक तपासासाठी छत्रपती संभाजीनगर येथे पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, दुसऱ्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.