

Preparations in full swing for the Mahalaxmi Devi Navratri festival
भागवत खरग
कडेठाण, पुढारी वृत्तसेवा : पैठण तालुक्यातील कडेठाण येथील श्रीक्षेत्र कोल्हापूरच्या अंबाबाईचे महाराष्ट्रातील उपपीठ मानल्या जाणाऱ्या कडेठाण येथील श्री महालक्ष्मी देवीच्या नवरात्र महोत्सवाची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मंदिर व्यवस्थापन समिती व गावकऱ्यांच्या, सहकायनि नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे.
यात्रेदरम्यान भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिर परिसरात तब्बल तीस सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मंदिर परिसर स्वच्छ व सुंदर करण्यात आला असून, भव्य रंगरंगोटीने मंदिर उजळून निघालेले आहे. संपूर्ण मंदिरांवर व नवीन बांधलेल्या शिखरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
माहूरगड येथील रेणुकामाता मंदिरातून गावातील तरुण पायी चालत आणणार ज्योत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षात पायी ज्योत आणण्यासाठी महाराष्ट्रातील साडेतीन पीठांपैकी एक असलेले श्रीक्षेत्र माहूरगड येथील रेणुकामाता मंदिरातून ज्योत घेऊन कडेठाण येथील तरुण ३७० किलोमीटर पायी प्रवास करत घटस्थापनेच्या दिवशी २२ सप्टेंबर रोजी कडेठाण येथे ज्योत घेऊन सकाळीच महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये येतील.
ज्योत मंदिरात आणल्यानंतर देवीच्या चरणी विजयादशमीपर्यंत ठेवण्यात येणार आहे. मंदिर समितीने भाविकांच्या सोयीसाठी दर्शन व्यवस्थेत सुधारणाही केल्या आहेत. भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली असून, रांगेतील भक्तांना पिण्याच्या पाण्याची, आरोग्य से-वेची तसेच सावलीची योग्य सोय करण्यात आली आहे. यात्रेत येणाऱ्या वृद्ध, महिला व लहान मुलांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
कडेठाण हे कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीचे मंदिर उपपीठ असल्याने संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच देशातील विविध भागांतून हजारो भाविक दरवर्षी नवरात्र-ोत्सवासाठी येथे हजेरी लावतात. यामुळे यात्रेच्या काळात गावात आनंदमय वातावरण निर्माण होऊन भाविकांच्या जयघोषाने परिसर दुमदुमतो. कडेठाणमधील श्री महालक्ष्मी देवीचा हा नवरात्र महोत्सव केवळ धार्मिकच नव्हे, तर सामाजिक एकात्मतेचा व सांस्कृतिक वैभवाचा अद्भुत संगम ठरणार आहे.
नवरात्रोत्सवाच्या काळात दररोज देवीच्या विविध अलंकारातील दर्शनाची भक्तांना संधी मिळणार आहे. महाआरती, पालखी सोहळा, भजन-कीर्तन, देवीचा जागर उत्सव यासारख्या अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, गावातील महिला मंडळे, युवक संघटना व विविध सामाजिक संस्था यात्रेत सक्रिय सहभाग नोंदवत असून, उत्सव अधिक भव्य करण्यासाठी सर्वजण एकदिलाने काम करत आहेत.