Chhatrapati Sambhajinagar Crime : उच्चशिक्षित 'साहेबां' कडूनच पत्नींचा अमानुष छळे

नगररचना अधिकाऱ्याकडून २५ लाखांसाठी डॉक्टर पत्नीला त्रास | वैद्यकीय अधिकाऱ्याकडून प्लॉटसाठी पत्नीला घरातून हाकलले
Crime  News
Crime News pudhari
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : समाजात उच्चशिक्षित आणि मोठ्या पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांकडूनच हुंड्यासाठी आणि पैशाच्या हव्यासापोटी आपल्या पत्नीचा अमानुष छळ केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार शहरात उघडकीस आला आहे. एका घटनेत नगररचना विभागात कार्यरत असलेल्या अधिकारी पतीने स्वतःचे हॉस्पिटल टाकण्यासाठी २५ लाख रुपये आणावेत म्हणून डॉक्टर पत्नीचा छळ केला. तर दुसऱ्या घटनेत चक्क एका वैद्यकीय अधिकाऱ्याने (डॉक्टर) पत्नीच्या माहेरचा प्लॉट स्वतःच्या नावावर करण्यासाठी तिला मारहाण करत घराबाहेर हाकलून दिले. या दोन्ही प्रकरणांत अनुक्रमे सिडको आणि सातारा पोलिस ठाण्यात अधिकारी पतींसह सासरच्या मंडळींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

घटना पहिली : २५ लाखांसाठी डॉक्टर पत्नीला मारहाण

सिडको पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, ३१ वर्षीय महिला मेडिकल ऑफिसरचा विवाह २१ फेब्रुवारी २०२१ रोजी रोहित गायकवाड याच्याशी पंचतारांकित हॉटेलमध्ये झाला होता. रोहित हा नगररचना विभागात अधिकारी असून, मुलीच्या वडिलांनी लग्नात २५ तोळे सोने व इतर वस्तूंसाठी तब्बल २५ लाख रुपये खर्च केले होते. मात्र सासरच्यांची पैशाची हाव संपली नाही. तू डॉक्टर आहेस, स्वतःचे हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेराहून २५ लाख रुपये घेऊन ये, असा तगादा लावत पतीने शिवीगाळ व मारहाण सुरू केली.

Crime  News
बलात्काराची तक्रार देण्यास गेलेल्या पीडितेच्या पतीला पोलिसाची मारहाण ?

सासूने विवाहितेला माहेरी फोनवर बोलताना स्पीकर ऑन ठेवण्याची सक्ती केली. नणंद आणि नणंदोई यांनीही टोमणे मारून मानसिक त्रास दिला. अखेर पैशाच्या अट्टाहासापोटी सासरच्यांनी ३ ऑक्टोबर २०२५ रोजी विवाहितेला लहान मुलासह घराबाहेर हाकलून दिले. पैसे आणल्याशिवाय घरात पाऊल ठेवायचे नाही, अशी धमकी दिली. स्वतःचे बिंग फुटू नये म्हणून पतीने घटस्फोटाचा खोटा दावाही दाखल केला. याप्रकरणी पती रोहित गायकवाड, सासरे लहानू गायकवाड, सासू सुमती, नणंद प्रियांका आणि नणंदोई दुर्गेश तिपायले यांच्याविरुद्ध सिडको पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटना दुसरी : प्लॉटसाठी वैद्यकीय अधिकारी पतीचा सासुरवाडीत धिंगाणा

सातारा पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या दुसऱ्या गुन्ह्यात, नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या पतीनेच पत्नीचा अमानुष छळ केला. ३२ वर्षीय विवाहितेचा विवाह ५ जून २०१२ रोजी परमेश्वर बाबासाहेब घोळवे याच्याशी झाला होता. लग्नात माहेरच्यांनी १५ लाख रुपये रोख आणि ११ तोळे सोने दिले होते.

२०१६ मध्ये विवाहितेच्या आईचे निधन झाल्यानंतर तिच्या भावाने बीड बायपास परिसरात तिला एक प्लॉट भेट दिला. त्यावर घर बांधण्यासाठी परमेश्वरने सासऱ्याकडून वेळोवेळी २५ लाख रुपये हातउसने घेतले. मात्र घर बांधून झाल्यावर हा प्लॉट स्वतःच्या नावावर करण्यासाठी त्याने पत्नीला मारहाण सुरू केली. मुलाची फी भरण्याच्या बहाण्याने त्याने पत्नीचे मंगळसूत्र व अंगठी गहाण ठेवून पैसे आणले, पण फी भरली नाही. १ एप्रिल रोजी त्याने दारूच्या नशेत पत्नीला घराबाहेर हाकलून दिले.

Crime  News
Viral Video: घराबाहेरील पेरू तोडले, निवृत्त सैनिकाने चिमुरडीला साखळदंडाने बांधून बेदम मारले; व्हिडिओ पाहून डोळ्यातून पाणी येईल

त्यानंतर ९ एप्रिल रोजी सासुरवाडीत जाऊन दारूच्या नशेत दरवाजावर लाथा मारल्या. ङ्गमी सर्व कपडे काढून कॉलनीत फिरून तुमची इज्जत घालवतो, घर जाळून आत्महत्या करतो आणि चिठ्ठीत तुमचे नाव लिहितो, अशी धमकी दिली. विवाहिता पोलिसांत जात असताना त्याने त्यांच्या गाडीसमोर स्वतःची गाडी आडवी लावून त्यांना पाडण्याचाही प्रयत्न केला. याप्रकरणी पती परमेश्वर घोळवे याच्याविरुद्ध सातारा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news