District Bank Election: MLA Danve in the Mahayuti camp
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : राज्यात सद्यस्थितीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा तीव्र संघर्ष पेटला आहे. मात्र, छत्रपती संभाजीनगरात जिल्हा बँकेच्या निवडणुकीत या दोन्ही आघाड्यांचे दिग्गज नेते एकत्र आले आहेत. उबाठा सेनेचे नेते आमदार अंबादास दानवे यांनी या निवडणुकीत चक्क महायुतीसोबत हातमिळवणी केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
जिल्हा बँकेच्या नवीन संचालक मंडळ निवडणुकीची रणधुमाळी जोमाने सुरू आहे. बँकेच्या २१ पैकी ८ संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. संपूर्ण निवडणूकच बिनविरोध करण्याचा नेत्यांचा प्रयत्न फसल्याने आता १२ जागांसाठी ३१ उमेदवारांमध्ये लढत रंगणार आहे. यातही महायुती आणि महाविकास आघाडी पॅनलमध्ये खरा सामना आहे. काही अपक्ष उमेदवारही मैदानात उतरले आहेत.
निवडणूक निर्णय अधिकारी समृत जाधव यांनी बुधवारी (दि. २४) निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांची नावे व चिन्हांची यादी प्रसिद्ध केली. यात विशेष म्हणजे ठाकरे सेनेचे नेते आ. दानवे यांनी महायुतीच्या पॅनलमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत मविआलाच धक्का दिला आहे. नुकतेच ठाकरे सेनेच्या सहा खासदारांनी शिंदेसेनेत प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवर दानवे यांनीही कडवी टीका केली होती. तेच दानवे आता शिंदेसेना आणि भाजपाच्या महायुतीत गोटात दाखल झाल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. दरम्यान, संचालक निवडीसाठी ४ जुलै रोजी मतदार प्रक्रिया पार पडणार आहे.
सावे विरुद्धची थेट लढत टाळली
बिगर शेती संस्था मतदारसंघातून राज्याचे मंत्री अतुल सावे आणि आ. दानवे यांनीही उमेदवारी अर्ज भरल्याने या दोन्ही नेत्यांमध्ये लढत रंगणार होती. मात्र, दानवे यांनी महायुतीकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत हा सामना टाळल्याचीही चर्चा सुरू आहे. या दोन्ही नेत्यांसह याच मतदार संघात रामराव शेळके, अर्जुन पाटील, रवींद्र काळे या महायुतीच्या उमेदवारांना कपबशी चिन्ह मिळाले आहे. तर मविआचे खा. कल्याण काळे, जगन्नाथ काळे, बाबूराव पवार, देवयानी डोणगावकर, प्रणिकेत पाटील, दादाराव वानखेडे यांना छत्री ही निशाणी मिळाली आहे.