

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा बँक निवडणुकीत अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी पडद्यामागे मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. अनेक उमेदवारांच्या मनधरणीसह विविध प्रयत्नाअंती महायुतीचे नेते ७ जागा (शिवसेना ५, भाजप २) बिनविरोध निवडून आणण्यात यशस्वी ठरले. यात पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यासह आ. विलास भुमरे, आ. रमेश बोरणारे यांचा समावेश आहे. काँग्रेसची एक जागा बिनविरोध आली. उर्वरित १२ संचालकपदासाठी ३१ उमेदवारांमध्ये निवडणुकीचा सामना रंगणार आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीची रणधुमाळी जोमाने सुरू असून, अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी सकाळपासूनच महायुतीत मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आल्याचे चित्र होते. २१ संचालकपदासाठी तब्बल १२० इच्छुकांनी अर्ज दाखल केल्याने उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी राज्याचे मंत्री अतुल सावे, खा. संदीपान भुमरे आणि आ. अब्दुल सत्तार यांना स्वतः अनेक उमेदवारांची मोठी मनधरणी करावी लागली.
दिग्गज नेत्यांच्या प्रयत्नाअंती अखेर प्राथमिक कृषी पतपुरवठा वि.का.स. सेवा सहकारी संस्थांच्या तालुकानिहाय ९ जागांपैकी ५ जागा बिनविरोध निघाल्या. यात खुलताबादेतून भाजपचे संदीप निकम, फुलंब्रीतून काँग्रेसचे अनिल बोरसे, सिल्लोडमधून शिंदेसेनेचे अर्जुन गाढे, पैठणमधून आ. विलास भुमरे, वैजापुरातून आ. रमेश बोरणारे यांचा समावेश आहे.
कृषी पणन संस्था व शेतमाल प्रक्रिया मतदार संघातून आ. अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव समीर सत्तार, अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती मतदारसंघातून पालकमंत्री संजय शिरसाट, तर विशेष मागास प्रवर्ग /विमुक्त जाती मतदारसंघातून वैजापूरचे नगराध्यक्ष दिनेश परदेशी हे बिनविरोध निवडून आले आहे. याची अधिकृत घोषणा आज बुधवारी (दि.२४) होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी समृत जाधव यांनी सांगितले.
सावे आणि दानवेमध्ये लढत रंगणार
बँकेला पाच संचालक देणाऱ्या बिगर शेती मतदारसंघातून राज्याचे मंत्री अतुल सावे आणि आ. अंबादास दानवे यांच्यात लढत रंगणार आहे. याच मतदारसंघातून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा देवयानी डोणगावकर, जगन्नाथ काळे, रामराव शेळके हे देखील मैदानात आहेत. प्राथमिक कृषी पतपुरवठामधून खा. कल्याण काळे आणि राष्ट्रवादीचे अभिषेक देशमुख यांच्यात सामना रंगणार आहे. महिला प्रतिनिधी मतदारसंघातून आ. अनुराधा चव्हाण, मुक्ता तांगडे आणि निलिमा पाटील उमेदवार आहेत.
या दिग्गजांनी घेतले अर्ज मागे
नवनिर्वाचित आ. सुहास शिरसाट, किशोर शितोळे, राजू शिंदे, हर्षदा शिरसाट, निशांत पाटील, अर्जुन पाटील, एकनाथ जाधव, राजू भुमरे, रवींद्र संचेती, देवयानी डोणगावकर, श्रद्धा माने, प्रदीप शिंदे, गोकुळसिंग राजपूत, बाबुराव पवार, कविता घुगे यांच्यासह अनेकांनी अर्ज मागे घेतले आहे.
१२ जागांसाठी ३१ उमेदवार मैदानात, आज चिन्ह वाटप
बँकेच्या २१ संचालकपदांसाठी १२० उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले होते. त्यात ८३ उमेदवारांनी माघार घेतली. तर वैयक्तीक मतदार संघातून दाखल एकच अर्ज छाननीतच अवैध ठरला. त्यामुळे आता हे पद रिकामेच राहणार आहे. एकूण २० संचालकपदांसाठीच ही निवडणूक होत असून पैकी ८ उमेदवार बिनविरोध निवडून आले. उर्वरीत १२ जागांसाठी राज्याचे मंत्री अतुल सावे, खा. कल्याण काळे, आ. अनुराधा चव्हाण, आ. अंबादस दानवे यांच्यासह ३१ उमेदवार रिंगणात आहे. या उमेदवारांना चिन्हांचे वाटप बुधवारी (दि. २४) केले जाणार आहे.
जिल्हा बँक निवडणूकीत बिनविरोध आलेले ८ संचालक
पालकमंत्री संजय शिरसाट (शिंदेसेना)
आ. विलास भुमरे (शिंदेसेना)
आ. रमेश बोरणारे (शिंदेसेना)
अब्दुल समीर सत्तार (शिंदेसेना)
अर्जुन गाढे (शिंदेसेना)
संदीप निकम (भाजप)
दिनेश परदेशी (भाजप)
अनिल बोरसे (काँग्रेस)