Nanded DCC Bank Election : वि.प.निवडणूक प्रक्रिया संपताच जिल्हा बँक निवडणुकीची घोषणा?

निवडणूक निर्णय अधिकारीपदी जिल्हा उप निबंधकांची नियुक्ती
Nanded DCC Bank Election
Nanded DCC Bank Electionpudhari photo
Published on
Updated on

विशेष प्रतिनिधी

नांदेड : नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाल्यानंतर लगेचच नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. या निवडणुकीचे मतदान जुलैच्या शेवटच्या आठवड्यात होईल, असे येथे समजले.

वरील निवडणुकीसाठी बँकेच्या सभासद मतदारांची यादी मे महिनाअखेर प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर १८ दिवसांमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर होणे अपेक्षित होते; पण ही मुदत उलटून गेल्यावर आता २३ तारखेला निवडणूक कार्यक्रम जाहीर होत असून जिल्हा उप निबंधकांवर निवडणूक निर्णय अधिकारीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Nanded DCC Bank Election
TDCC Bank Election : ठाणे जिल्हा बँकेवर सहकार पॅनलचे ८ संचालक बिनविरोध

शेजारच्या परभणी जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम गेल्या आठवड्यात जाहीर झाला. तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीची प्रक्रियाही अंतिम टप्प्यात आहे. या दोन बँकांनंतर शताब्दी ओलांडलेल्या नांदेड बँकेतील संचालकांच्या २३ जागांसाठी रणसंग्राम सुरू होणार आहे.

बँकेच्या मागील संचालक मंडळातील तत्कालीन अध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर, दुसरे माजी अध्यक्ष आ.प्रताप पाटील चिखलीकर व अन्य सहा दिग्गज संचालकांचा बँकेतील १० वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे कायद्यातील नवीन तरतुदीनुसार आता होणार्‍या निवडणुकीतून ते ‘बाद’ झाले आहेत. त्यांच्या तसेच अन्य काही जागांवरही बँकेमध्ये नवे संचालक दाखल होणार, असे दिसत आहे.

भाजपा नेते खा.अशोक चव्हाण यांनी या बँकेवर पुढील पाच वर्षांसाठी आपल्या समर्थकांचे वर्चस्व राहावे, याचे नियोजन मागील काही दिवसांपासून सुरू केले होते. मधल्या काळात विधान परिषद निवडणुकीमुळे बँकेच्या निवडणुकीचा विषय बाजूला पडला होता. या निवडणुकीत खा.चव्हाण आणि आ.चिखलीकर हे एकत्र येणार का, याकडेही संबंधितांचे लक्ष लागले आहे.

Nanded DCC Bank Election
Chhatrapati Sambhajinagar district bank election : मंत्री सावे, आ. जाधव यांच्यासह बारा जणांच्या नावावर आक्षेप

विधान परिषद निवडणुकीत चिखलीकर यांनी आधी वेगळा पवित्रा घेतला होता; पण नंतर त्यांनी वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार महायुतीचा धर्म पाळत भाजपा उमेदवाराला समर्थन दिले. बँकेच्या आगामी निवडणुकीत त्यांच्या गटाचे प्रतिनिधी म्हणून कैलास देशमुख गोरठेकर, शिवराज पाटील होटाळकर यांना संधी दिली जाणार का, हे पुढील टप्प्यात स्पष्ट होईल. तसेच कंधार व लोहा तालुक्यातून आ.चिखलीकर कोणाला उभे करतात, याकडेही लक्ष लागले आहे.

  • नांदेड जिल्हा बँकेवर ११ वर्षांच्या प्रदीर्घ प्रशासकीय राजवटीनंतर २०१६ साली लोकनियुक्त संचालक मंडळ आले. त्यानंतर ५ वर्षांनी २०२१ साली पुन्हा एक निवडणूक झाली. त्या निवडणुकीत अशोक चव्हाण यांच्या गटाने चिखलीकर गटाचा दारुण पराभव केला होता. आता होणार्‍या निवडणुकीनंतर बँकेवर आपल्या गटाचे वर्चस्व राहावे, यासाठी खा.चव्हाण यांनी बरीच जुळवाजुळव केली आहे. खा.चव्हाण शुक्रवारी मुंबईला रवाना झाले. बँक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर ते नांदेडमध्ये दाखल होतील, असे सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news