

आन्वा ः उन्हाळ्यात शेतशिवारात मशागत करण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर केला जातो. यासाठी डिझेलची आवश्यकता असते. परंतु ग्रामीण भागातील ट्रॅक्टर चालकांना डिझेल मिळणे अवघड झाले आहे. यामुळे शेतशिवारात मशागत करायची कशी, असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून डिझेल तुटवड्यामुळे ग्रामीण भागातही अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. डिझेलचा तुटवडा असल्याने नांगरणीसाठी एकरी सोळासे रुपये मोजावे लागत आहे. ग्रामीण भागात मशागत ट्रॅक्टरवरच विसंबून राहिल्याने शेतकऱ्यांना डिझेलसाठी शहर गाठावे लागत आहे.
डिझेलच्या तुटवड्याची अफवा पसरली असून पेट्रोल पंपासमोर डिझेल तसेच पेट्रोल खरेदीसाठी रांगा लागल्या आहेत. मात्र, या ठिकाणी मोजकेच डिझेल दिले जात आहे. शेतशिवारात मशागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात डिझेलची आवश्यकता आहे. हे डिझेल मिळणे तूर्त अवघड झाले आहे. यामुळे उन्हाळ्यात मशागत करायची कशी, असा गंभीर प्रश्न शेतकरी कुटुंबापुढे निर्माण झाला आहे.
गुढीपाडव्यानंतर शेतशिवारात मशागत करण्यासाठी सुरुवात केली जाते. यातूनच शेतकऱ्यांनी शेतशिवारात मशागतीला प्रारंभ केला. याचवेळी डिझेल नसल्याची अफवा गावामध्ये पसरत आहे. जो, तो डिझेल मिळविण्यासाठी धावत आहे. मात्र, त्यांना पाहिजे तितके डिझेल मिळणे अवघड आहे. यातून गावामध्ये चांगलीच धावपळ सुरू आहे.
उधारी ठेवणेही बंद
शेतशिवाराची मशागत करण्यासाठी लागणारे डिझेल, हे डिझेल मिळविताना येणाऱ्या अडचणी पाहता उधारीवर उन्हाळी हंगामात कामे करण्यासाठी ट्रॅक्टर चालकांकडून नकार दिला जात आहे. यामुळे पुढील काळात शेताची मशागतही अडचणीत येणार आहे. अनेकांनी उधारी ठेवणेही बंद केले आहे.
मशागतीला विलंब
ट्रॅक्टरचालकांना मशागतीसाठी लागणारे डिझेल मिळविण्यासाठी रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यातही पुरेश डिझेल न मिळाल्याने उन्हाळ्यातील मशागत करायची कशी आणि मशागतीला विलंब झाला तर जमीन तापणार कशी, असा प्रश्न आहे.