

Depositors were duped of Rs 50 lakhs, Saibaba Mahila Credit Society president and vice president arrested
लासूर स्टेशन, पुढारी वृत्तसेवा : ठेवीदारांची ५० लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या लासूर स्टेशन येथील श्री साईबाबा महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा उषा गणेश मोरे व उपाध्यक्षा सुशीला राजेंद्र मस्के यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी (दि. १४) बेड्या ठोकल्या. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
लासूर स्टेशन येथील गीताबनमध्ये दीड वर्षापूर्वी श्री साईबाबा महिला नागरी सहकारी पतसंस्थेची शाखा सुरू केली होती. या शाखेत फिर्यादी साईनाथ रामराव बनकर (रा. बाभूळगाव-नांगरे) यांच्यासह इतर काहींनी ५० लाख रुपयांच्या मुदत ठेवी ठेवल्या होत्या. परंतु, नंतरच्या काळात ठेवीदारांना पैशाची गरज असतानाही पतसंस्थेकडून त्यांना पैसे देण्यास टाळाटाळ करण्यात आली. त्यामुळे अखेर साईनाथ बनकर यांनी २९ जून रोजी पोलिसांत धाव घेत पतसंस्थेच्या संचालक मंडळासह अधिकाऱ्यांविरोधात फिर्याद दिली होती. या प्रकरणात मध्यरात्री १ वाजता शिल्-लेगाव ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
या प्रकरणाचा तपास करत असताना पतसंस्थाच्या अध्यक्षा उषा मोरे व उपाध्यक्ष सुशीला मस्के (दोघीही रा. प्लॉट नं. २ सुंदरनगर, पडेगाव, छत्रपती संभाजीनगर) या रायपूर, लासूर स्टेशन भागात आल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेला मिळाली होती. गुरुवारी (दि. १३) दुपारी ३:३० वाजता पोलिसांनी त्यांना सापळा रचून अटक केली. त्यांना शुक्रवारी गंगापूर सत्र न्यायालयात हजर केले पोलिस कोठडी सुनावण्यात आली. ही कारवाई सपोनी अमोल सातोदकर, हेड कॉन्स्टेबल दीपेश नागझरे, हेड कॉन्स्टेबल जितेंद्र बोरसे, महिला पोलिस कॉन्स्टेबल आर. एल. मंचुके, चालक अजिनाथ तिडके यांनी केली आहे.
वीस जणांविरोधात गुन्हा
बनकर यांच्या फिर्यादीवरून पतसंस्थेच्या अध्यक्षा उषा मोरे, उपाध्यक्षा सुशीला मस्के, सचिव गंगासागर आप्पासाहेब शेजवळ, मुख्य व्यवस्थापक गणेश रामहरी मोरे, संचालिका सविता गोकुळ मोरे, सरिता रामकिसन म्हस्के, गीता चंद्रकांत चव्हाण, कविता विष्णू सुरडकर, सुजाता सतीश शेरखाने, मंजुश्री दगडू कावळे, पार्वती गणेश रवीवाले, कल्पना नरसिंह माळी, धनश्री योगेश म्हस्के, शीतल रामनाथ नरोडे, रंजना आजिनाथ मोरे, हिराबाई विलास सौदागर, पल्लवी अशोक आघाव, पूजा आदिनाथ नवले, लासूर स्टेशनचे शाखा व्यवस्थापक बळीराम गोरखनाथ मोरे, मुख्य प्रमोटर भरत रामहरी मोरे या २० जणांविरुद्ध शिल्-लेगाव ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.