

Rs 25 lakh looted from district bank during daytime
पाचोड, पुढारी वृत्तसेवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पैठण शाखेमधून दावरवाडी येथील शाखेत रोख रक्कम घेऊन येणाऱ्या कर्मचाऱ्याला पाचोड-पैठण रस्त्यावरील दावरवाडी (ता. पैठण) शिवारात दोन चोरट्यांनी दुचाकीवर येऊन कर्मचाऱ्याच्या स्कुटीला कट मारून व त्यांना दगड मारून त्यांच्या गाडीतील तब्बल पंचवीस लाख रुपये लुटल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि.१५) रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या विषय अधिक माहिती अशी की, पैठण येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमधून दावरवाडी येथील बँक कर्मचारी गणेश आनंद पहिलवान हे शनिवारी सकाळी सव्वादहा वाजता आपल्या दुचाकी क्रमांक (एम एच २० बी झे ८३७४) वरून निघाले होते. पाचोड- पैठण रस्त्यावरून येत असताना दावरवाडी शिव-ारात सकाळी अकरा वाजेच्या सुमारास दोन दुचाकीस्वार पाठीमागून भरधाव वेगाने येत त्यांच्या स्कुटीला कट मारून अपघात करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर त्यांच्या स्कुटीवर दगड मारून त्यांच्याकडे असणारे रोख पंचवीस लाख रुपये हिसकावून घेत पोबारा केला. या घटनेनंतर गणेश पहिलवान याने तत्काळ त्यांच्या शाखा अधिकाऱ्यांना झालेल्या घटनेची दूरध्वनीवरून माहिती दिली अन् संबंधित चोरट्यांचा पाठलाग केला, परंतु चोरट्यांनी डेरा मार्गी आपला मोर्चा वळून सुसाट वेगामध्ये त्या ठिकाणाहून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन पंडित
पोलिस उपनिरीक्षक राम बहाराते, उपनिरीक्षक गोविंद राऊत, पोलिस कर्मचारी संदीप वैद्य, अण्णासाहेब गव्हाणे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली चोट्यांचा मागवा काढला, तर या घटनेची माहिती स्थानिक गुन्हा शाखेला मिळाली असता सहायक पोलिस निरीक्षक पवन इंगळे, सपोनि. संतोष मिसाळे, विष्णू गायकवाड, विठ्ठल डोके, अशोक वाघ शिवानंद बन्गे, अनिल काळे, राहुल गायकवाड, सनी खरात, योगेश तळमाळे यांनीही तत्काळ घटनास्थळी येऊन सर्व घटनेची पाहणी करून आपल्या पद्धतीने तपासाचे चक्र फिरवले आहे. या घटनेची पाचोड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांसमोर मोठे आव्हान..!
गेल्या अनेक दिवसांपासून पाचोड पोलिसांची प्रतिमा मलिन होत असल्याचे पहायला मिळत आहेत. कारण गुन्हेगारीच्या घटनेमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे या घटनेतील आरोपी शोधण्यासाठी पोलिसांनी मोठी कसरत करावी लागणार आहे. मागील काही महिन्यांपासून चोरी प्रकरणातील आरोपी सापडत नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे पाचोड पोलिसांना आरोपी पकडण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यामुळे पाचोड पोलिसांना या गुन्ह्यातील आरोपी पकडणे एक मोठे आव्हान असणार
पोलिस यंत्रणा कुचकामी
मागील काही महिन्यांपासून पाचोड पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये चोरी दरोडा या घटनेमध्ये मोठी वाढ झाल्याचे पहायला मिळत आहेत. गंभीर गुन्ह्याचा मागील काही दिवसांपासून तपास लागेना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता चोरट्यांचे मनबोल वाढत असल्याचे पहायला मिळत आहे. पोलिस यंत्रणाही कुचकामी झाली काय असाही प्रश्न उपस्थित होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाचोड पोलिस ठाणे हद्दीमध्ये जातीने लक्ष घालणे गरजेचे आहे.