

Railways takes action against ticketless passengers and others
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दक्षिण मध्य रेल्वेच्या विविध मार्गावर धावणाऱ्या रेल्वेत अधिकाऱ्यांनी अचानक तपासणी मोहीम राबवली. यात विनातिकीट, अनियमित प्रवास, अनबुक केलेले सामान आदी अशा २४६ प्रवाशांवर कारवाई करत त्यांच्याकडून ८४ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. ही मोहीम यापुढेही सुरूच राहणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.
नांदेडचे सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक एन. सुब्बा राव, विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कामले, डॉ. विजय कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम नुकतीच राबवण्यात आली. यावेळी राज्य राणी एक्सप्रेस, बंगळुरू एक्सप्रेस, हैदराबाद-पूर्णा एक्सप्रेस, गुंटूर एक्सप्रेस, रायचूर एक्सप्रेस, परळी-अकोला पॅसेंजर, मनमाड-नांदेड पॅसेंजर, संपर्क क्रांती एक्सप्रेस, नगरस-ोल-काचीगुडा, पुणे एक्सप्रेस आणि हडपसर विशेष ट्रेनची तपासणी करण्यात आली.
यात विनातिकीट प्रवास करणारे १६२ जण आढळले असून, त्यांच्याकडून या पथकाने ६४,७०० रुपये वसूल केले. तर अनियमित प्रवास-१४, अनबुक केलेले सामान-७० अशा २४६ प्रवाशांकडून ८४ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
दरम्यान, याव्यतिरिक्त स्थानकांवर आणि गाड्यांवरील संशयास्पद पॅकेजेस आणि दावा न केलेल्या वस्तू ओळखण्यासाठी विशेष तपासणी करण्यात आली. या दरम्यान तिकीट ऑन ट्रान्सफरच्या ४ प्रवाशांकडून ९ हजार १०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.