

Chhatrapati Multistate Depositor Death Case
गेवराई : स्वतःच्या मुलांच्या शिक्षणासाठी कष्टाने कमावलेली आयुष्याची जमापूंजी छत्रपती मल्टीस्टेटमध्ये ठेवली. मात्र जेव्हा या ठेवींची गरज होती तेव्हा मल्टीस्टेटने दगा दिला. अनेकदा खेट्या मारूनही पैसे मिळेनात. पैशाअभावी मुलांच्या शिक्षणाला अडचणी येऊ लागल्या. त्यामुळे हताश झालेल्या पित्याने अखेर 'धन्यवाद माझ्या मुलांच्या शिक्षणाचे तुम्ही वाटोळे केलेत, एवढा अंत एखाद्याचा बघू नये, असा संदेश पाठवत मल्टीस्टेटच्या दारात गळफास घेऊन जीवन संपवले.
हा धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यातील गेवराई येथे बुधवारी (दि.१८) पहाटे तीनच्या सुमारास उघडकीस आला. सुरेश आसाराम जाधव (४६, रा. खळेगाव ह. मु. गणेशनगर, गेवराई) असे आत्महत्या केलेल्या ठेवीदाराचे नाव आहे. घटनेनंतर छत्रपती मल्टीस्टेटचा चेअरमन संतोष भंडारी फरार झाला आहे.
फिर्यादी कविता सुरेश जाधव (३५) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे पती सुरेश जाधव हे शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांना एक मुलगी साक्षी (२१) व एक मुलगा शुभम (१८) असे दोन अपत्ये असून, ते दोघेही शिक्षण घेत आहेत. शेतीत कष्ट करून त्यांनी पोटाला चिमटा घेत मुलांच्या शिक्षणासाठी काही रक्कम साठवून ठेवली होती. २०२० पासून ११ लाख ५० हजार रुपये त्यांनी मुदत ठेव म्हणून छत्रपती मल्टीस्टेटच्या गेवराई शाखेत ठेवले होते. मात्र मागील दोन वर्षांपासून वारंवार ठेवलेले पैसे परत द्या, असे म्हणत होतो. परंतु ते आम्हाला पैसे परत देत नव्हते. आज देतो, उद्या देतो असे म्हणून टाळाटाळ करीत होते.
सहा महिन्यांपूर्वी सुरेश जाधव यांनी ठेवीचे पैसे परत मिळत नसल्याने विषारी औषधाची बाटली घेऊन शाखेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा छत्रपती मल्टीस्टेटचा चेअरमन संतोष ऊर्फ नाना बसंता भंडारी याने ठेवीमधील अडीच लाख रुपये परत दिले होते. उर्वरित ९ लाख रुपये दोन महिन्यांनंतर देतो, असे आश्वासन दिले होते. परंतु त्यानंतर वारंवार चकरा मारूनही पैसे परत मिळाले नाही. त्यामुळे सुरेश जाधव तणावात राहत होते. दोन्ही मुलांच्या शिक्षणासाठी पैसे नसल्याने ते अधिकच खचून गेले होते, असे त्यांच्या पत्नीने तक्रारीत म्हटले आहे. दोन दिवसांपूर्वी गेले होते शाखेत छत्रपती मल्टीस्टेट गेवराई शाखेत मंगळवारी (दि.१७) पैसे मागण्यासाठी जाधव दाम्पत्य दोन्ही मुलांसह गेले होते. दिवसभर ते शाखेत पैसे परत मिळविण्यासाठी विनवण्या करत होते. परंतु शाखेच्या व्यवस्थापक ज्योती क्षीरसागरने पैसे दिले नाही. उलट सुरेश जाधव यांना अर्वाच्च भाषेत बोलून शाखेतून बाहेर काढले. त्यानंतर सुरेश यांच्या पत्नीने त्यांना फोन करून मुलांसोबत घरी थांबण्यास सांगितले होते. मात्र बुधवारी पहाटे छत्रपती मल्टीस्टेटच्या दारासमोरच सुरेश यांनी गळफास घेतला.
पोलिस ठाण्यासमोर संतप्त नातेवाइकांचा ठिय्या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा केला. मात्र जोपर्यंत दोषींविरुद्ध गुन्हा दाखल होत नाही, चेअरमन संतोष भंडारी यांना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा नातेवाइकांनी घेतला होता. पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला. नातेवाईक संतप्त झाल्याचे पाहून अखेर पोलिसांनी तात्काळ चेअरमन संतोष भंडारीविरुद्ध गुन्हा नोंद केला. फरार झालेल्या भंडारीचा पोलिस शोध घेत आहेत.
सुरेश जाधव यांनी आत्महत्या करण्याआधी शाखा व्यवस्थापक ज्योती क्षीरसागर यांना एक अंतिम मेसेज केला होता. माझ्या मुलांच्या शिक्षणाचे तुम्ही वाटोळे केल्याबद्दल धन्यवाद. एवढा अंत एखाद्याचा बघू नये. वेळोवेळी पैसे मागूनही दिले नाहीत, म्हणून मी तुमच्यासमोरच जीवन संपवतोय. हा निरोप चेअरमन संतोष भंडारी व भंडारी दादा यांना द्या, असा हृदयाला पिळवटून टाकणारा संदेश त्यांनी पाठवला. त्यानंतर मल्टीस्टेटच्या दारात गळफास घेऊन जीवनाचा अंत केला. या घटनेमुळे बीड जिल्ह्यात संतापाची लाट पसरली आहे.
बीड जिल्ह्यात अनेक मल्टीस्टेट संस्थांनी ठेवीदारांच्या हजारो कोटींवर डल्ला मारला आहे. या संस्थांच्या मालकांनी संस्थेत घोटाळे उघड झाल्यानंतर कुलूप लावून धुम ठोकली. यामध्ये सर्वात मोठी संस्था ज्ञानराधा मल्टीस्टेट, राजस्थानी मल्टीस्टेट, साईराम अर्बन, जिजाऊ मल्टिस्टेट अशा एकामागून एक संस्था बुडाल्याने ठेवीदार हताश झाले आहेत. कष्टाचा पैसा कधी मिळणार, या चिंतेत असलेल्या ठेवीदारांचा संयम आता ढळतो आहे. याकडे सरकारने लक्ष घालण्याची मागणी नागरिकांमधून व्यक्त होत आहे.