

छत्रपती संभाजीनगर : प्रेमाला वयाची मर्यादा नसते आणि माणुसकीला सीमा नसतात, याचा प्रत्यय देणारा एक हृदयस्पर्शी व्हिडिओ सध्या छत्रपती संभाजीनगरात व्हायरल होत आहे. ९३ वर्षीय निवृत्ती शिंदे या आजोबांनी आपल्या ७५ वर्षीय पत्नी शांताबाई यांच्या दहा वर्षांपासूनच्या स्वप्नाला एका छोट्या सोन्याच्या माळेद्वारे पूर्ण केले. ही माळ जरी एक ग्रॅमची असली, तरी त्यामागील प्रेम आणि त्यागाची कहाणी सर्वांच्या हृदयाला भिडली आहे.
निवृत्ती आणि शांताबाई शिंदे यांचे आयुष्य साधे. मागून मिळणाऱ्या दानावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. घर नाही, तरीही त्यांच्या मनात प्रेम आणि एकमेकांबद्दलची काळजी कायम आहे. शांताबाई यांना गेल्या दहा वर्षांपासून गळ्यात सोन्याची माळ घालण्याची इच्छा होती, पण आर्थिक परिस्थितीमुळे ती पूर्ण होत नव्हती. निवृत्ती यांनी आपल्या पत्नीच्या या इच्छेला आपले ध्येय बनवले आणि वर्षभर मेहनत करून कसेबसे 2,500 रुपये जमवले. या पैशातून त्यांनी एका गॅमची सोन्याची माळ घेण्याचा निर्णय घेतला.
मात्र, त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता. चार दुकानांमधून त्यांना अपमान पचवून बाहेर पडावे लागले, त्यांना हाकलून देण्यात आले. तरीही हार न मानता निवृत्ती हे पाचव्या दुकानात पोहोचले, जिथे ‘वनग्राम’ या सोन्याच्या दुकानातील दुकानदाराने त्यांना केवळ जवळच केले नाही, तर ही माळ मोफत देऊन माणुसकीचा परिचय दिला. जेव्हा निवृत्ती यांनी शांताबाईंच्या गळ्यात ही माळ घातली, तेव्हा त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले, जे व्हिडिओत कैद झाले आणि सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाले.
‘मला माळ घ्यायची होती, म्हणून मी मागून पैसे जमवले. अनेक दुकाने फिरलो, पण शेवटी माळ मिळाली,’ अशी भावना निवृत्ती शिंदे यांनी व्यक्त केली. तर शांताबाई यांनी सरकारकडे घराची मागणी करताना सांगितले, ‘आम्ही मागून खातो, आम्हाला घर नाही. सरकारने आम्हाला मदत करावी, घर द्यावे.’
हा व्हिडिओ केवळ एका माळेची कथा नाही, तर त्याग, प्रेम आणि माणुसकीचा संगम आहे. निवृत्ती आणि शांताबाई यांचे प्रेम आणि दुकानदाराची उदारता यांनी समाजात अजूनही माणुसकी जिवंत असल्याचे दाखवून दिले. हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करत आहे आणि प्रेमाच्या या कहाणीने सर्वांना प्रेरणा दिली आहे.