

ACB Trap Gramsevak Caught Taking Bribe
वैजापूर : जनसुविधा योजनेतंर्गत स्मशानभूमीच्या कामाचे उर्वरित देयक काढून देण्यासाठी उपसरपंचाकडून दहा हजारांची लाच स्वीकारणाऱ्या ग्रामसेवकाला छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज (दि. १८) रंगेहाथ पकडले. विजयकुमार पंडितराव क्षीरसागर, (वय ५३, रा. ३९, म्हाडा कॉलनी, शाहनुरवाडी, छत्रपती संभाजीनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , घटनेतील तक्रारदार हे वैजापूर तालुक्यातील भायगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच असून गावातीलच जनसुविधा योजनेतंर्गत स्मशानभूमीचे काम केले होते. त्या कामाचे एकूण बिल ६ लाख ९६ हजार रुपये होते. दरम्यान ते काम पूर्ण झाल्याची नाहरकत (एनओसी) तक्रारदार यांनी ग्रामपंचायत कार्यालय भायगाव येथे दाखल केले. त्यापैकी राहिलेले उर्वरित रकमेचे ९४ हजार रुपयांचे बिल काढून चेक देण्यासाठी ग्रामसेवक विजय क्षीरसागर याने तक्रारदार यांचे नावे चेकवर सही करून देण्यासाठी १५ हजार रुपये लाचेची मागणी केली.
परंतु, तक्रारदारांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे यासंबंधी तक्रार केली. त्यांनी केलेल्या तक्रारीवरून छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी सकाळी तालुक्यातील जरुळ फाट्यावर सापळा रचला.
दरम्यान, १५ हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या ग्रामसेवक विजय क्षीरसागर याला तडजोडीअंती १० हजार रुपये लाचेची रक्कम घेताना पथकाने रंगेहाथ पकडले. सदरची कारवाई छत्रपती संभाजीनगर येथील पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलिस अधीक्षक मुकुंद आघाव, पोलिस उपअधीक्षक सुरेश नाईकनवरे, संगीता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेंद्र सिनकर, विलास चव्हाण, सी.एन. बागुल यांच्या पथकाने केली.