

Demands accepted; but Jarange remains firm on the hunger strike
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणाबाबत विविध प्रलंबित मागण्यांसाठी मनोज जरांगे यांच्यासोबत गुरुवारी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, उदय सामंत आणि मकरंद पाटील यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली. शासनाने जरांगे यांच्या सर्व मागण्याही मान्य केल्या, परंतु सर्व मागण्यांबाबत शासनादेश जारी होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असे जरांगे यांनी स्पष्ट केल्यामुळे हा तिढा कायम राहिला.
मराठा समाजाच्या शिंदे समितीने शौधलेल्या ५८ लाख नोंदीनुसार तातडीने जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे यासह अन्य १५ मागण्यांसाठी मनोज जरांगे यांनी २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले होते. या उपोषणावर तोडगा काढण्यासाठी गेल्या ३ दिवसांपासून मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, मंत्री उदय सामंत, आ. प्रसाद लाड संभाजीनगरात तळ ठोकून होते. जरांगेंच्या मागण्यांवर शासनाने तोडग्याचा मसुदा मंगळवारीच अंतरवालीत पाठविण्यात आला होता.
बुधवारी रात्री आमदार प्रसाद लाड यांनी अंतरवालीत जाऊन मसुद्याबाबत जरांगे यांच्यासोबत चर्चा केली. दोघांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. शासनाच्या मसुद्यावर जरांगेंनी समाधान व्यक्त केले होते. मात्र जोपर्यंत शासन आपल्या मागण्यांवर अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही अशी भूमिका जरांगे यांनी घेतली.
यानंतर पुन्हा एकदा गुरुवारी मंत्री विखे पाटील, उदय सामंत, मंत्री मकरंद पाटील, आमदार लाड हे रात्री अंतरवाली सराटी येथे पोहचले. त्यांनी २ तास जरांगेंच्या अभ्यासक शिष्टमंडळासोबत चर्चा केली. त्यानंतर शासनाचे हे शिष्टमंडळ उपोषणस्थळी जरांगे यांना भेटण्यासाठी पोहचले. तेथेही शिष्टमंडळासोबत जरांगेंची तासभर जाहीर चर्चा झाली. चर्चेअंती जरांगेच्या १५ ही मागण्या मान्य केल्या. परंतु या मागण्यांचे शासनादेश व अंमलबजावणी होईपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असे जरांगेंनी स्पष्ट केले त्यामुळे शासनाची शिष्टाई निष्फळ ठरली-
हे माझं शेवटचं आंदोलन : जरांगे
सरकारच्या शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर शेवटच्या क्षणी जरांगे यांनी उपोषण सोडण्यास मात्र नकार दिला. समाजाच्या सर्व मागण्यांबाबत शासनादेश काढा आणि अंमलबजावणी सुरू करा तेव्हाच मी उपोषण मागे घेतो. हे माझं शेवटचं आंदोलन आहे, त्यामुळे केवळ आश्वासनावर उपोषण मागे घेणार नाही असे जरांगे यांनी स्पष्ट केले. १० तारखेपर्यंत सरकार कोणतीही कामे शिल्लक ठेवणार नाही. ११ तारखेपर्यंत सरकारने कामे केली तर गुलाल घेऊन १२ तारखेला मुंबईला जाऊ, ३५ ते ४० लाख तरुण येणार आहे, आदेश निघाले तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुलाल टाकू, असे त्यांनी स्पष्ट केले-
मराठा हिताचे अनेक निर्णय : विखे
मुंबईपासून सुरू झालेला संघर्ष अंतरवालीमध्ये सुरू केलेले आंदोलन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आतापर्यंत अनेक निर्णय घेतले. न्या. शिंदे समितीने ५८ लाख नोंदी शोधून काढल्यात. एसईबीसीमध्ये साडेतीन लाख मराठा समाजाच्या तरुणांनी दाखले घेतले आहे. शिंदे समिती स्थापन झाल्यापासून अनेक विद्यार्थ्यांना दाखले घेतले, २०२३ नंतर लाखो विद्यार्थ्यांना दाखले दिले गेले आहे, हे मनोज जरांगेंमुळे झाले आहे.
आता आम्ही १० सप्टेंबर तारीख दिली आहे, छत्रपती शिवाजी महाराज मंडळाअंतर्गत शिबिरे घेतली जाणार आहे. जात प्रमाणापत्रासाठी कमिती स्थापन केल्या आहे, प्रत्येक जिल्ह्यासाठी नोडल अधिकारी नेमले जातील, आदी अनेक प्रश्न आम्ही मार्गी लावले आहेत. पण, विखे पाटील बोलत असताना अचानक मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे विखे पाटलांना भाषण थांबवावे लागले, मी तुमच्यातलाच आहे, मी तुमचाच भाऊ आहे, जरांगे यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले. आमचे सरकार हे मराठा समाजासाठी हिताचे काम करत आहे. जरांगे पाटील जे सुचना करत आहे, त्याचा आम्ही नेहमी आदर केला आहे, त्यामुळे माझी विनंती आहे. वास्तव बदलत नाही, आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे, जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावे, अशी विखे पाटलांनी केली.