

Declaring a wet drought in Marathwada. Dr. Kalyan Kale's demand through a statement to the Chief Minister.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडले असून, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी बुधवारी (दि.१७) खासदार डॉ. कल्याण काळे यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, काही भागांत १२० ते २२० मिमी एवढा ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने अंत्यत बिकट परिस्थिती निर्माण झाली. शेतकऱ्यांची खरीप पिके वाहून गेली असून, जनावरे, गोठे, शेतातील बांध यांचेही नुकसान झाले.
नागरी भागात पाणी शिरल्याने घरगुती साहित्य व व्यापारी आस्थापनांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे तातडीने पंचनामे करण्यासाठी महसूल, कृषी व पशुसंवर्धन विभागांची संयुक्त पथके स्थापन करण्याची, शेतकऱ्यांच्या कर्जाची स्थगिती व व्याजमाफी देण्याची, तसेच व्यापारी व नागरिकांना स्वतंत्र निधीतून दिलासा देण्याची मागणी डॉ. काळे यांनी केली आहे. तसेच ही फक्त नैसर्गिक आपत्ती नसून, आयुष्यावर झालेला आघात आहे. यावर मुख्यमंत्री यांनी तात्काळ आदेश देऊन शेतकरी व नागरिकांना आधार द्यावा, असेही ते म्हणाले.