

A man jumped into a well at a Cambridge school after not being paid for his work.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : वर्षभरापूर्वी कामावरून काढलेल्या एकाने कामाचा योग्य मोबदला न दिल्याने पैसे देण्याची मागणी करत थेट केंब्रिज शाळेच्या विहिरीत उडी घेतली. त्यानंतर स्वतःच डायल ११२ ला कॉल करून माहिती दिल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमनच्या पथकाला पाचारण करून व्यक्तीला सुखरूप विहिरीबाहेर काढले. रवी सोमनाथ तुर्कने, असे उडी घेणाऱ्याचे नाव असल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुर्कने हे केंब्रिज शाळेत कामाला होते. मात्र वर्षभरापूर्वी त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले. त्यांना कामाचा मोबदला पूर्णपणे दिला होता. मात्र तुर्कने यांच्या म्हणण्यानुसार कामाचा योग्य मोबदला दिला नाही. माझे अधिकचे पैसे द्या किंवा कामावर पुन्हा घ्या, अशी मागणी केली.
मात्र मागणी पूर्ण होत नसल्याने त्यांनी थेट केंब्रिज शाळेतील विहिरीत उडी घेतली. त्यांना अग्निशमनचे अधिकारी अशोक खांडेकर, विजय राठोड, ड्यूटी इन्चार्ज सोमीनाथ भोसले, जवान मदन ताठे, प्रवीण पचलोरे, साई बोरुडे, कृष्णा भागवत, अजय कोल्हे यांच्या पथकाने सुखरूप विहिरीबाहेर काढून पोलिसांच्या स्वाधीन केले.
या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिली.