

Declare Gangapur Taluka drought-affected
गंगापूर, पुढारी वृत्तसेवा : पावसाने मोठी ओढ दिल्याने गंगापूर तालुक्यात खरीप पिकांची मोठ्या प्रमाणात वाताहत झाली असून, पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे गंगापूर तालुका तातडीने दुष्काळग्रस्त जाहीर करून बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी गंगापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.
तालुक्यातील पाझर तलाव, साठवण तलाव तसेच मध्यम प्रकल्प कोरडे पडले आहेत. तालुक्याची जीवनवाहिनी असलेली शिवना नदीही यंदा अद्याप वाहिली नसल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. भूजल पातळी खालावल्याने शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांपुढे पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे.
त्यातच शेतीपंपांसाठी वारंवार होणाऱ्या लोडशेडिंगमुळे शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. उपलब्ध पाण्याचा वापर करून पिके वाचविणेही अवघड झाले आहे. त्यामुळे शेतीपंपांचे लोडशेडिंग तातडीने बंद करून अखंडित व सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली.
निवेदनात पिकांच्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजार रुपये थेट डीबीटीद्वारे द्यावेत, टंचाईग्रस्त गावांमध्ये वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करावेत, जनावरांसाठी चारा छावण्या व चारा बँक उभारावी, तसेच कृत्रिम पावसाचे नियोजन करावे, अशी मागणी करण्यात आली.
याशिवाय शेतकऱ्यांची सक्तीची कर्जवसुली थांबवून व्याजासह कर्जमाफी द्यावी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठी रोजगार हमीची कामे मोठ्या प्रमाणात सुरू करावीत, अशाही मागण्या काँग्रेसने केल्या आहेत.
प्रशासनाने या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन शासनाकडे तातडीने प्रस्ताव पाठवावा व शेतकरी आणि नागरिकांना दिलासा द्यावा. अन्यथा जनतेच्या न्याय्य मागण्यांसाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिला.
यावेळी गंगापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सूर्यकांत गरड पाटील यांच्यासह काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.