

Dean Dr. Shivaji Sucre's inspection at Ghati Hospital
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
रुग्णांसाठीच्या खुर्चा आणि वॉटर कूलर चक्क नर्सिंग स्टाफ रूममध्ये बघून अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे शुक्रवारी (दि.१) चांगलेच भडकले. तुम्हाला हवे तर मी नवीन देतो. मात्र रुग्णांची गैरसोय खपवून घेतली जाणार नाही, असा संताप त्यांनी व्यक्त केला. तसेच रूममधील वॉटर कूलर आणि खुर्चा तात्काळ बाहेर काढण्याचे आदेशही दिले.
घाटीत गोरगरीब आणि गरजू रुग्णांना विनामूल्य औषधोपचारासोबतच आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अधिष्ठातांची धडपड सुरू आहे. त्यांच्या प्रयत्नातूनच अनेक बॉडाँचे नूतनीकरण झाले आहे. अत्याधुनिक यंत्रसामग्री, उपचार साहित्यही उपलब्ध झाले आहेत.
यासह रुग्ण, नातेवाइकांच्या सुविधेसाठी वॉर्डामध्ये नवीन वॉटर कूलर आणि लोखंडी खुच्र्यांचे सेटही आले आहेत. हेच वॉटर कूलर आणि खुर्चा बाल अति दक्षता विभाग वॉर्डातील स्टाफ रूममध्ये मांडल्याचे शुक्रवारी अधिष्ठाता डॉ. सुक्रे यांच्या पाहणीत दिसून आले.
त्यामुळे संतापलेल्या अधिष्ठातांनी हे कूलर रुग्ण, नातेवाइकांसाठी आहे. खुर्चाही वॉर्डासाठी आहेत. हे साहित्य रूममध्ये कोणी आणले? असा जाब विचारल्याने परिचारिका आणि कर्मचारी निरुत्तर झाले. रूममधील हे साहित्य तातडीने बाहेर वॉर्डात हलवण्याचे निर्देश अधिष्ठातांनी दिले. यावेळी उपाधिष्ठाता डॉ. प्रभा खैरे, डॉ. काशीनाथ गर्कळ यांच्यासह महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सुरेश भाले उपस्थित होते.
जुने कपडे, साहित्य अस्ताव्यस्त कोंबले
वॉर्डातील इतर खोल्यांमध्ये धुळीने माखलेल्या असंख्य चादरी, बेडशीटचे गड्ढे अस्ताव्यस्त कोंबलेले दिसून आले. उपकरणे, स्ट्रेचरही पडून होते. खोल्यांचीही दुरवस्था झालेली होती. यावरही अधिष्ठातांनी संताप व्यक्त केल्याने त्यांच्या समोरच स्टाफने तातडीने सारवासारव सुरू केली.