

Second Vande Bharat Express will be available soon
छत्रपती संभाजीनगर, पुढारी पुढारी वृत्तसेवा : छत्रपती संभाजीनगर ते मुंबई मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला मिळालेला प्रतिसाद पाहून ऑक्टोबर महिन्यात येणाऱ्या दुसऱ्या लॉटमध्ये लवकरच दुसरी वंदे भारत एक्सप्रेस या मार्गावर देण्याचे आश्वासन रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिल्याची माहिती खा. डॉ. भागवत कराड यांनी शुक्रवारी (दि.१) दिली.
छत्रपती संभाजीनगर- परभणी दुहेरीकरणाला मंजूरी मिळाल्यानंतर आभार व्यक्त करण्यासाठी खा. डॉ. भागवत कराड यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. यावेळी मराठवाड्यांतील रेल्वेसंबंधी विविध प्रश्नांवर चर्चा केली. या चर्चेदरम्यान कराड यांनी छत्रपती संभाजीनगर मुंबई मार्गावर आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस द्यावी अशी मागणी केली.
याला तात्काळ होकार देत ऑक्टोबर मध्ये दुसरा लॉट येणार आहे. या लॉटमध्ये निश्चित या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस देण्याचे आश्वासन रेल्वे मंत्र्यांनी दिले. यावेळी कराड यांच्या सोबत खा. डॉ. शिवाजी कालगे, खा. अॅड. उज्वल निकम, खा. डॉ. कल्याण काळे, खा. बलवंत वानखेडे व अॅड. अतुल कराड हे उपस्थित होते. दरम्यान रेल्वेमंत्र्यांसोबत झालेल्या विस्तृत चर्चेबाबत खा. कराड रविवारी माहिती देणार आहेत.