

Digital arrest in Tamil Nadu: Those who stole Rs 2.25 crore arrested
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : तामिळनाडूच्या चेन्नई येथील निवृत्त सरकारी अधिकाऱ्याला सात दिवस डिजिटल अरेस्ट ठेवून तब्बल २ कोटी २६ लाख रुपये उकळणाऱ्या मोठ्या टोळीतील दोन सदस्यांना तामिळनाडू पोलिसांच्या सायबर क्राईम विंगने संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या मदतीने देवळाई परिसरातील हॉटेलमधून वेड्या ठोकल्या. विशेष म्हणजे डिजिटल अरेस्टच्या देशभरातील सायबर भामट्यांच्या टोळीतील सदस्य सक्रिय असल्याचे निष्पन्न झाले आहे. कोट्यवधींच्या फसवणूक प्रकरणात आरोपींना अटक झाल्याने खळबळ उडाली आहे.
श्रीकांत सुरेशराव गाडेकर (३४, रा. वडगाव कोल्हाटी, छ. संभाजीनगर), नरेश कल्याणराव शिंदे (२६, रा. आर्यन सिटी, तीसगाव चौफुली, वाळूज) अशी अटक आर-ोपींची नावे असल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली. तामिळनाडू राज्यातील चेन्नईच्या तिरुवनचेरी येथील प्रभाकरन कुंधू चंद्रन रुवी हे केंद्र शासनाच्या सेवेतून निवृत्त अधिकारी आहेत.
त्यांना दिल्ली सायबर पोलिस असल्याचे भासवून, कॅनरा बँकेतील खात्यावर मनी लॉन्डरिंगद्वारे मोठा आर्थिक गैरव्यवहारात नाव असल्याचा धाक दाखविण्यात आला. व्हिडिओ कॉल करून सायबर भामट्यांनी पोलिस ठाण्याचा सेटअप, पोलिसांची युनिफॉर्म असा बनाव करून त्यांना जाळ्यात ओढले. अटकेची भीती दाखवून १० ऑगस्ट ते १७ ऑगस्ट असे सात दिवस डिजिटल अरेस्ट ठेवले. त्यांच्याकडून २ कोटी २७ लाख २४ हजार ९०० रुपये उकळले. याप्रकरणी तिरुवनचेरी (तांबरम शहर), तामिळनाडू येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दोघांच्या बँक खात्यात आले १.३६ कोटी
आरोपी श्रीकांत गाडेकर आणि नरेश शिंदेच्या बँक खात्यात डिजिटल अरेस्टमध्ये उकळलेल्या रकमेतून १ कोटी ३६ लाख एवढी रक्कम आली होती. सायबर भामट्यांचे रॅकेट देशभरात पसरलेले असल्याने हे दोघे केवळ बँक खात्यात पैसे घेण्याच्या भूमिकेपुरते आहेत. यांचा आकाही महाराष्ट्रातच असल्याचा तामिळनाडू पोलिसांचा अंदाज आहे. प्रथमच डिजिटल अरेस्टच्या गुन्ह्यात शहरातून आरोपींना अटक झाली असल्याने खळबळ उडाली आहे.
पोलिसांच्या भीतीने हॉटेलमध्ये लपले
तामिळनाडू सायबर क्राईम विंगचे निरीक्षक व्ही. के. सशिकुमार यांनी पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांची भेट घेऊन मदत मागितली. डॉ. राठोड यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेला कामाला लावले. एपीआय पवन इंगळे, अंमलदार श्रीमंत भालेराव, अशोक वाघ, शिवानंद वनगे यांच्या पथकाने २९ आणि ३० जुलै असे दोन दिवस दोन्ही आरोपींचे लोकेशन ट्रेस केले. दोघेही पोलिस मागे लागल्याच्या भीतीने देवळाई येथील एका हॉटेलात खोली करून लपले होते. पोलिसांनी दोघांना पकडून तामिळनाडू पोलिसांच्या स्वाधीन केले.
दोन दिवस शोधमोहीम राबविली
मदतनी माझ्याकडे मदत मागितली होती. त्यांच्याकडे दोन्ही आरोपींबाबत तांत्रिक तपासतील सर्व माहिती होती. त्यामुळे आमच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला त्यांच्या मदतीसाठी पाठविले. वारंवार दोघेही लोकेशन बदलत होते. दोन दिवस शोध घेतल्यानंतर ते सापडले. दोघांच्या बँक खात्यात सुमारे १ ते दीड कोटी रुपये जमा झाले होते. त्यावरून त्यांना तामिळनाडू पोलिसांनी अटक केली आहे.