

'Damini Squad' comes to the aid of the mentally ill woman who was pelting stones
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा मध्यवर्ती बसस्थानक परिसरात बेवारस स्थितीत फिरणाऱ्या आणि मनोरुग्ण अवस्थेत प्रवाशांवर दगडफेक करणाऱ्या एका महिलेला दामिनी पथकाने केवळ आधारच दिला नाही, तर तिच्यावर यशस्वी उपचार करून तिला सुखरूप तिच्या कुटुंबाच्या स्वाधीन केले. गुरुवारी (दि.२) क्रांती चौक पोलिस ठाण्यात पत्नीला पाहताच पतीला रडू कोसळले.
अधिक माहितीनुसार, २० जून रोजी मध्यवर्ती बसस्थानक येथे एक महिला प्रवाशांवर व बसवर दगडफेक करत असल्याची माहिती कंट्रोल रूमला मिळाली होती. दामिनी पथकाने तातडीने धाव घेत पाहणी केली असता, ही महिला गेल्या दीड महिन्यापासून तेथे बेवारस भटकत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
मनोरुग्ण असल्याने दामिनी पथकाने तिला ताब्यात घेऊन क्रांती चौक ठाण्यात आणले. त्यानंतर या महिलेला पडेगाव येथील डॉ. कादरी मानसिक उपचार केंद्रात दाखल करण्यात आले. उपचारामुळे तिच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाली. दरम्यान, दामिनी पथकाच्या निर्मला निंभोरे यांनी तपास करत ही महिला कन्नड तालुक्यातील आडगाव वस्ती येथील असल्याचे शोधून काढले.
तिला तीन लहान मुले, पती आणि दीर असल्याची माहिती समोर आली. यादरम्यान तिला काही दिवस मातोश्री आश्रमात आश्रय देण्यात आला. यासाठी सागर पागोरे यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. दामिनी पथकाच्या उपनिरीक्षक कांचन मिरधे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार निर्मला निंभोरे, अनिता खैरे आणि अंमलदार बाळू वणे यांनी ही कामगिरी पार पाडली.
पोलिसांची सक्त ताकीद
गुरुवारी महिलेचा पती आणि दीर तिला घेण्यासाठी क्रांती चौक पोलिस ठाण्यात आले. तब्बल दीड महिन्यानी पत्नीला सुखरूप पाहताच पतीला अश्रू अनावर झाले. जवळपास दोन तास तो पोलिस ठाण्यात रडत होता. यावेळी पोलिस निरीक्षक शिवाजी तावरे यांनी 'एवढे दिवस पोलिसांनी तिची काळजी घेतली आहे, यापुढे तिला कोणताही त्रास होता कामा नये,' अशी सक्त ताकीद पती आणि दिराला दिली. यावेळी उपनिरीक्षक आत्माराम घुगे उपस्थित होते.