

Crop damage assessment underway in the Waluj area
वाळूज, पुढारी वृत्तसेवा : प्रशासनाच्या आदेशानुसार वाळूज बुद्रुक सजाच्या महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शनिवारी (दि. ४) वाळूजच्या पूर्व भागातील शेतशिवाराची पाहणी करून पिकांच्या नुकसानीचे पंचनामे केले. यावेळी अनेक शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष जाऊन पिकांची पाहणी करण्यात आली.
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळण्यासाठी पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार वाळूज परिसरात महसूल विभागाकडून पंचनाम्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे अद्याप पंचनामे झालेले नाहीत, त्यांनी संबंधित महसूल विभागाशी संपर्क साधून तातडीने पंचनामे करून घ्यावेत, असे आवाहन ग्राममहसूल अधिकारी मनीषा कदम यांनी केले आहे.
वाळूजसह परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचा परिणाम आगामी रब्बी हंगामावरही होण्याची शक्यता आहे. तूर, कापूस आणि सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने उत्पादनात घट होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. त्यातच विहिरींच्या पाणीपातळीतही झपाट्याने घट होत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
शनिवारी ग्राममहसूल अधिकारी मनीषा कदम आणि ग्राममहसूल सेवक अमोल खैरनार यांनी गट क्रमांक ८०, ८३, १७५ तसेच वाळूजवाडी परिसरातील विविध शेतांची पाहणी करून पिकांच्या नुकसानीचे पंचनामे केले. यावेळी शेतकऱ्यांनी पिकांच्या नुकसानीची व्यथा अधिकाऱ्यांसमोर मांडली. पिकांसाठी केलेला खर्चही भरून निघेल की नाही, अशी चिंता अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली. यावेळी रखमाजी आरगडे, दयानंद साबळे, सुलताने, शेख शाकीर, श्रीरंग आरगडे यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.