

Rickshaws directly onto the platform for 'Vande Bharat' passengers
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा तीन प्रवाशांना सोडण्यासाठी रिक्षाचालकाने चक्क रेल्वे प्लॅटफॉर्मवर रिक्षा नेल्याची धक्कादायक प्रकार रविवारी (दि.४) सकाळी ७ च्या सुमारास मुख्य रेल्वेस्थानकांवर घडला. या दरम्यान रेल्वे सुरक्षा दलाचा एकही जवान उपस्थित नव्हता. याच दरम्यान रेल्वे आली असती तर प्रवाशांच्या गोंधळामुळे मोठ्या अपघाताची शक्यता होती. या प्रकाराने रेल्वेच्या सुरक्षा व्यवस्थेचे वाभाडे काढले.
रविवारी सकाळी मुंबईकडे जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेससाठी तीन प्रवासी रिक्षाने रेल्वेस्थानकांवर आले. रिक्षाचालकाने पार्सल विभागाच्या बाजूने रिक्षा आणत ती थेट प्लॅटफॉर्मवर चढवली. तो एवढ्यावरच थांबला नाही तर प्लॅटफॉर्मवर रिक्षा चालवली. ही बाब पार्सल विभागातील नईम शेख यांच्या निदर्शनास येताच त्यांनी रिक्षाचालकाला हटकले.
रिक्षा चालकाने शेख यांना प्रवाशांकडे लगेज जास्त आहे, म्हणून येथपर्यंत यावे लागले. असे उद्धट उत्तर दिले. यावेळेस प्लॅटफॉर्मवर एकही रेल्वे सुरक्षा दलाचा जवान उपस्थित नव्हता. दरम्यान शेख यांनी याची माहिती तात्काळ सुरक्षा दलांना दिली. तो पर्यंत रिक्षाचालकाने तेथून पलायन केले होते.
सकाळच्या वेळेत मुंबईला जाणारे आणि नांदेडकडे जाणारे अनेक प्रवासी प्लॅटफॉर्मवर होते. अशात रेल्वे आली असती तर प्रवाशांची धावपळ आणि रिक्षाचीं अडचण यात अपघात होण्याची शक्यता होती. एरव्ही नातेवाईकांना सोडण्यासाठी आलेल्यांवर डोळे वटारणाऱ्यांना मात्र प्लॅटफॉर्मवर जात असलेल्या रिक्षा नजरेस पडला नसल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.