

Crime News: Accountant swindled lakhs by hacking mobile phone
वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा मोबाईल हॅक करून लेखापालला ६ लाख ७७ हजार ५०० रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी अज्ञात भामट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या विषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नितीन पवार (रा. साई हौसिंग सोसायटी, बजाजनगर) हे एका कंपनीत अकाऊन्टट म्हणून काम करतात. ९ मे रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास भामट्याने त्यांचा मोवाईल हॅक करून त्यांच्या एसबीआय सेव्हिग खात्यातून तसेच एसबीआय क्रेडिट कार्ड व आयसीआयसीआय क्रेडिट कार्डमधून सात वेळा ट्रॅन्जेक्शन करून तब्बल ६ लाख ७७ हजार ५०० रुपये काढून घेतले.
दरम्यान पवार यांनी अनेकवेळा त्यांचा मोबाईल चालू करण्याचा प्रयत्न केला मात्र तो चालू होत नसल्याने तो नादुरुस्त झाला असे त्यांना वाटले होते. रात्री उशिरा त्यांनी मोबाईल चालू केला तेव्हा त्यांचा मोबाईल पूर्णपणे रिसेट झालेला होता.
पवार यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये बँकेचे अॅप डाऊनलोड केले तेव्हा त्यांच्या बँक खात्यावरून तसेच क्रेडिट कार्डमधून ६ लाख ७७ हजार ५०० रुपये काढण्यात आले असल्याचे समजले. या प्रकरणी नितीन पवार यांनी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून वाळूज पोलिस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी भामट्या शोध घेत आहेत.