

Crime News: A halt to illegal collection at the Gangapur weekly market
गंगापूर, पुढारी वृत्तसेवा : येथील आठवडे बाजारात गेल्या अनेक महिन्यांपासून गोरगरीब शेतकरी व छोटे दुकानदारांकडून नगरपालिका वसुलीच्या नावाखाली सुरू असलेल्या बेकायदा खंडणी वसुलीला अखेर आळा बसला आहे. स्वयंघोषित ठेकेदारांकडून विना पावती होत असलेल्या लुटीबाबत नगरपरिषद प्रशासनाने तत्काळ दखल घेतली.
आठवडे बाजारात तालुक्यातील शेतकरी व छोटे व्यापारी आपली दुकाने लावतात. मात्र, काही ठेकेदारांकडून दमदाटी करत ५० ते १०० रुपये, तर शेव-चिवडा विक्रेत्यांकडून चक्क ५०० ते १ हजार रुपयांपर्यंत विना पावती वसुली केली जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. याबाबत काही दुकानदारांनी गंगापूर नगरपरिषदेकडे लेखी तक्रार केली होती.
या तक्रारीची गंभीर दखल घेत नगराध्यक्ष संजय जाधव, उपनगराध्यक्ष अमोल जगताप, नगरसेवक अख्तरभाऊ सय्यद, नगरसेवक नवनाथ कानडे तसेच सामाजिक कार्यकर्ते राहुल वानखेडे, सागर शेजवळ, शरद दारुंटे व सोहेल यांनी नगर परिषदेचे कर्मचारी बरोबर घेत थेट आठवडे बाजारात भेट देऊन शेतकरी दुकानदारांशी संवाद साधला. यावेळी घटनास्थळी पंचनामा करण्यात आला.
संबंधित ठेकेदारांवर कारवाई करण्याचे आश्वासन देत यापुढे नियमानुसार केवळ १० व २० रुपयांची अधिकृत पावती देऊनच वसुली करावी, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या.न
गरपरिषद पदाधिकाऱ्यांची थेट बाजारात भेट
आठवडे बाजारात येणाऱ्या शेतकरी व छोट्या दुकानदारांनी बेकायदा लूट होत असल्याने नगरपरिषद पदाधिकाऱ्यांची थेट बाजारात भेट देऊन वसुली करणाऱ्यांना ताकीद दिली. व्यापाऱ्यांची होणारी लट थांबवल्याबद्दल नगरपरिषद पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांचे आभार मानले. या कारवाईमुळे बाजारातील वातावरण अधिक सुरक्षित व दिलासादायक झाल्याची भावना व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.