

Construction Workers Welfare Board There are more brokers than beneficiaries around the material warehouses
वैजापूर, पुढारी वृत्तसेवा : राज्य शासनाच्या इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत मंजूर झालेल्या भांडी संचाचा (गृहोपयोगी संच) लाभ घेण्यासाठी आलेल्या लाभार्थीना सध्या खुलेआम ओरबाडण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे वाटप सुरू असलेल्या गोदामांभोवती लाभार्थीपेक्षा दलालांचाच विळखा आहे. एवढेच नव्हे तर गोदामचालकही आपले उखळ पांढरे करून घेत आहेत.
राज्य शासनाच्या राबविण्यात येणाऱ्या मोफत भांडी संच (गृहोपयोगी संच) योजनेच्या माध्यमातून नागरिकांची लूट सुरू असून, या पार्श्वभूमीवर शहरात अनेकांनी दुकाने थाटली आहेत. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी दोन हजारांपासून ते चार हजार रुपयांपर्यंत रक्कम उकळली जात आहे. त्यामुळे पैसे द्या अन् बोगस नोंदणी करून कामगार व्हा, अशी स्थिती आहे. योजनेच्या माध्यमातून सर्वच यंत्रणा लूट करीत असताना दुसरीकडे सहायक कामगार आयुक्त कार्यालयाकडून कोणतीही दखल घेतली जात नाही.
शासनाच्या इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांसाठी मोफत भांडी संच यासह ३३ योजना सुरू करण्यात आल्या आहेत. यात विशेषतः बांधकाम कामगारांसाठी मोफत भांडी संच या योजनेवर सध्या कामगारांच्या उड्या पडत आहे. कामगारांच्या जीवनात सन्मान, सुलभता आणि स्थैर्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. योजनेचा हेतू उदात्त असला तरी यातील काही यंत्रणेसाठी ही योजना मात्र खाती गव्हाण बनली आहे. तालुक्यात २५ ऑगस्टपासून लाभार्थीना भांडी संच वाटप सुरू आहे.
यासाठी रोटेगाव रेल्वेस्थानकानजीक व चिंचडगाव येथे गोदाम असून, लाभार्थ्यांना दूरपर्यंत जाऊन भांडी संच आणावा लागत आहे. अगोदर ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्यापासून ते मंजुरीपर्यंत संगणक चालकांनी लाभार्थीना लुटले. यापोटी पाच-पाच हजार रुपये घेण्यात आले. इथेच लाभार्थीची सुटका झाली, असे नाही. भांडी संच घेतानाही लाभार्थीची आर्थिक पिळवणूक केली जात आहे. संच घेताना दलाल एक ते दीड हजार रुपये उकळून आपल्या तुंबड्या भरीत आहेत. परंतु ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे. तालुक्यात भांडी संच घेणाऱ्या लाभार्थीची मोठ्या प्रमाणावर बोंब सुरू असतानाच कुणीच गांभीर्याने घ्यायला तयार नाही.
रोटेगावच्या गोदामातून आजपर्यंत २,४५६ लाभार्थीना संच वाटप करण्यात आले. वैजापूर तालुक्यात एकूण ३६ हजार ७७२ कामगारांची नोंदणी झालेली आहे. यात १७ हजार ४०३ सक्रिय नोंदणी आहे, असे बांधकाम सुविधा केंद्रातील अधिकारी सांगत
बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने भांडी संच वाटपाची जबाबदारी मुंबई येथील मफतलाल इंडस्ट्रीला दिलेली आहे. त्यांच्यामार्फत रोटेगाव व चिंचडगाव येथे गोदाम उभारण्यात आले असून, हे गोदाम दोघांना चालविण्यासाठी दिले आहेत. परंतु या वाहत्या गंगेत गोदामचालकही आपले हात धुवून' घेत आहेत. त्यामुळे ही योजना नेमकी कुणासाठी आहे? असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.