Lendi Dam : 'लेंडी'तून शेतीला बंद पाईपद्वारे पाणी, गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाकडून सर्वेक्षण सुरू
Water from 'Lendi' to agriculture through closed pipes, survey started by Godavari Irrigation Development Corporation
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा चाळीस वर्षांपासून रेंगाळलेले नांदेड जिल्ह्यातील लेंडी धरण पूर्णत्वास आले आहे. आता मुख्य कालवे आणि वितरिका, उपवितरिकांचे काम तेवढे बाकी आहे. परंतु या धरणातून शेतीला पारंपरिक वितरण प्रणालीऐवजी बंद पाईपद्वारे (नलिका वितरण प्रणाली) पाणी देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडून सर्वेक्षण सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. बंद पाईपद्वारे पाणी दिल्यास भूसंपादनाचा खर्च वाचण्यासोबतच पाण्याचा अपव्ययही टळणार आहे.
लेंडी हा आंतरराज्यीय सिंचन प्रकल्प आहे. लेंडी प्रकल्पास सन १९८५ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली होती. मात्र पुढे विविध कारणांनी या प्रकल्पाचे काम रखडले होते. नंतर सर्व अडथळे दूर होऊन प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली. धरणाचे काम पूर्ण होऊन नुकतीच घळभरणीही झाली आहे. या प्रकल्पामुळे २६ हजार ९२४ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
आता धरणाचे पाणी शेतीला उपलब्ध करून देण्यासाठी कालवे, वितरिका, उपवितरिका यांचे काम होणे बाकी आहे. मात्र आता पारंपरिक वितरण प्रणालीऐवजी नलिका वितरण प्रणालीचा वापर करण्याबाबत गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळस्तरावर विचार सुरू आहे. या कामासाठी सर्वेक्षणही केले जात आहे. सर्वेक्षणानंतर फिजिबिलिटी तपासली जाईल. त्यात हा पर्याय योग्य राहील याची खात्री झाली तर बंद नलिका वितरण प्रणालीचा वापर केला जाणार आहे.
शासनाचे नलिका वितरण प्रणालीला प्राधान्य
सिंचन प्रकल्पांच्या कालवे आणि वितरिकांसाठी भूसंपादन करावे लागते. त्यासाठी मोठ्या खर्च लागतो. शिवाय अनेकवेळा शेतकऱ्यांचा विरोधामुळे कामात अडथळे येतात. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळणे आणि भूसंपादनाचा खर्च कमी करण्याच्यादृष्टीने राज्य शासनाने बंद नलिका वितरण प्रणालीचा पर्याय निवडला आहे. शासनाने सन २०१७ पासूनच नव्या प्रकल्पांमध्ये या पर्यायाचा विचार करण्यास सुरुवात केली आहे.
कुंडलिका, मनीरामखेड प्रकल्पात बंद पाईपचा प्रयोग
मराठवाड्यात आतापर्यंत दोन सिंचन प्रकल्पांमध्ये नलिका वितरण प्रणालीचा अवलंब करण्यात आला आहे. यामध्ये बीड जिल्ह्यातील उर्ध्व कुंडलिका प्रकल्प आणि नांदेड जिल्ह्यातील मनीरामखेड प्रकल्पाचा समावेश आहे. दोन्ही प्रकल्पांचे काम पाच ते सहा वर्षांपूर्वी पूर्ण झालेले आहे.
संभाजीनगरातील दोन प्रकल्पांतही प्रस्तावित
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन प्रकल्प आणि गंगापूर उपसा सिंचन प्रकल्प या दोन प्रकल्पांतही नलिका वितरण प्रणाली प्रस्तावित करण्यात आली आहे. सध्या दोन्ही प्रकल्पांचे काम प्रगतिपथावर आहे. मुख्य कालवे झाल्यानंतर तेथून पुढे पारंपरिक वितरिकांऐवजी बंद पाईप टाकण्यात येणार आहेत.

