

Congress MLAs lashed out at rural police over Rohit Pathare murder case
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : वैजापूर येथील रोहित पठारे हत्या प्रकरणावरून काँग्रेसचे आमदार नितीन राऊत यांनी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. तीन ते चार दिवस हा अमानुष प्रकार सुरू असतानाही पोलिसांनी हस्तक्षेप करण्याऐवजी बघ्याची भूमिका घेतली. एवढे गंभीर प्रकार घडत असताना पोलिस प्रशासन काय करत होते, असा सवाल करत त्यांनी गुरुवारी (दि. १२) आयोजित पत्रकार परिषदेत केला. यावेळी त्यांनी वैजापूर पोलिसांना निलंबित करण्याची मागणी केली. रोहित यांच्या कुटुंबीयांची वैजापूर येथे भेट घेतल्यानंतर त्यांनी राज्य सरकार आणि पोलिस प्रशासनावर टीकेची झोड उठवली.
काँग्रेसचे आमदार नितीन राऊत यांनी गुरुवारी वैजापूर येथे जाऊन रोहित पठारे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मयत रोहित यांच्या कुटुंबीयांकडून घटनेची सविस्तर माहिती घेत अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुने यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी या प्रकरणातील अमानुष प्रकारांसह पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. यात तीन-चार दिवस अत्याचार सुरू असताना पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप का केला नाही ? या काळात पोलिसांची भूमिका काय होती? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणात वैजापूर पोलिसही दोषी असून, अद्याप एकाही पोलिस कर्मचाऱ्याचे निलंबन झाले नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
तसेच संबंधित पोलिसांवर तातडीने निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. रोहित पठारे यांना घरातून केस पकडून फरफटत बाहेर काढण्यात आले. त्यानंतर मारहाण करीत चौकाचौकांत फिरवण्यात आले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांनी पाणी मागितले असतानाही त्यांना पाणी न देता त्यांच्या तोंडात लघुशंका करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार घडला. रोहित यांच्या पत्नीने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला असता तिच्या पोटात लाथ मारण्यात आली.
वडील अनिल यांनाही मारहाण करण्यात आली, तर लहान भावाच्या डोक्याला अनेक टाके पडले आहेत. एवढे गंभीर प्रकार घडत असताना पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप राऊत यांनी केला. रोहित पठारे हे गरीब, मात्र स्वाभिमानी कुटुंबातील आणि आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते होते. अन्यायग्रस्तांच्या मदतीला धावून जाणारे आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले व्यक्तिमत्त्व अशा अमानुष पद्धतीने संपविण्यात आले, ही दुर्दैवी बाब असल्याचे ते म्हणाले. यावेळी शहराध्यक्ष सय्यद अक्रम, विजय वाहूळ यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते
खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवा
मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करावा. गुन्ह्याची तातडीने नोंद घेऊन लवकरात लवकर दोषारोपपत्र दाखल करावे आणि खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्याचे निर्देश द्यावेत. सर्व आरोपींना कठोर शिक्षा, अगदी फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी राऊत यांनी केली. संतोष देशमुख हत्या प्रकरणात राज्य सरकारने दाखविलेली गंभीरता रोहित पठारे प्रकरणात दिसत नसल्याची टीकाही त्यांनी केली. वैजापूर परिसरात अवैध धंदे सुरू असून, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यात ग्रामीण पोलिस प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोपही त्यांनी केला.
न्याय न मिळाल्यास राज्यव्यापी आंदोलन
रोहित पठारे यांच्या कुटुंबीयांना योग्य न्याय मिळाला नाही, तर राज्यभरातील दलित आणि आंबेडकरी समाज मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा राऊत यांनी दिला. फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांवर आधारित हे आंदोलन असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.