

Confusion in voter list for Minister Shirsat's daughter Ambadas Danve's allegations
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : निवडणूक आयोग थोतांड आहे. मतदार याद्यांमध्ये सर्वत्र घोळ होत आहे. इथेही पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या मुलीसाठी मतदार यादीत घोळ झाला आहे, असा आरोप विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. या प्रकरणात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे तक्रार केली असल्याचेही दानवे यांनी सांगितले.
दानवे यांनी गुरुवारी (दि.१३) पत्रकारांशी बोलताना वरील आरोप केला. ते म्हणाले, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी काही राजकीय नेत्यांच्या मुला-मुलींसाठी मतदार याद्यांमध्ये घोळ घालण्यात येत आहे. या निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ रोजी मतदार याद्या अंतिम करण्यात आल्या आहेत. मात्र पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या मुलीचे नाव यादीत समाविष्ट करण्यासाठी २७ ऑक्टोबर रोजी अर्ज करण्यात आला. बीएलओने राजकीय दबावाखाली हे नाव समाविष्ट केले. हे प्रकरण मी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. त्यांनी यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे, असेही दानवे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी राज्यातील इतरही काही उदारणे देत निवडणूक आयोगावर टीका केली.
मतदार नोंदणी निरंतर चालणारी प्रक्रिया : शिरसाट
खरे तर ही निरंतर प्रक्रिया चालणारी आहे. कोणीही कधीही नाव नोंदवू शकतो. माझ्या मुलीने ती ज्या ठिकाणी राहते, त्या भागात नाव नोंदविण्याचा अर्ज केलेला आहे. तिने प्रक्रिया पूर्ण केली आहे. आता ते नाव येईल किंवा नाही येईल. आधी तिचे नाव महापालिका हद्दीत होते. आता ती गोलवाडी भागात राहते. तो भाग ग्रामीणमध्ये येतो. दोन ठिकाणी नावे राहू शकत नाही. दोन्हीपैकी एकाच ठिकाणी नाव ठेवता येईल. दानवे यांनी केलेला आरोप हा बिनडोकपणाचे लक्षण आहे, असे मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले.
पार्थ पवारला गुन्हेगार म्हणून ट्रिट करावे
कोरेगाव पार्क येथील चाळीस एकर जमीन घोटाळा प्रकरणात पार्थ पवारवर गुन्हा दाखल व्हायला हवा होता. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच पार्थ पवारला वाचवत आहेत, असा आरोपही दानवे यांनी केला. पार्थ पवार हे काही लहान बाळ नाही. त्यांनी लोकसभा निवडणूक लढविलेली आहे. कुणाचा मुलगा म्हणून ट्रिट न करता त्याला गुन्हेगार म्हणूनच ट्रिट केले पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे वर्षा बंगल्यावर अजित पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात बराच वाद झाला. यावेळी अजित पवार यांनी पार्थवर गुन्हा दाखल झाला तर आपण सरकारमधून बाहेर पडू, असा इशारा दिला. त्यामुळे कदाचित फडणवीस पार्थला वाचवत असावेत, असेही दानवे म्हणाले.