

Confusion in procurement of maize in Kannada taluka
कन्नड, पुढारी वृत्तसेवा :
तालुक्यातील शेतकऱ्यांनी शासनाच्या मका खरेदीसाठी सहा केंद्रांवर ऑनलाईन नोंदणी केली असून, या केंद्रांवर जवळपास १५ हजार शेतकऱ्यांनी ५० हजार क्विटल मका खरेदीसाठी नोंदणी केली आहे. मात्र शासनाने तालुक्यासाठी ठरवलेला मका खरेदीचा कोटा केवळ ४ हजार ५०० क्विटलचा असल्याने उर्वरित नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी नेमके काय करावे, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
मका नोंदणी केल्यानंतर तब्बल दीड महिन्यानंतर खरेदी केंद्र सुरू करण्यात आली. तीही केवळ दोन केंद्रांवरच सुरू झाली असून उर्वरित चार केंद्रे अद्याप सुरू झालेली नाहीत. त्यामुळे शासनाची मका खरेदी प्रक्रिया कासवगतीने सुरू असल्याबद्दल तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
मका खरेदीचा कोटा फारच कमी असल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना पुढे काय करावे असा प्रश्न पडला आहे. दरम्यान, खरेदी केंद्रे उशिरा सुरू झाल्यामुळे तालुक्यातील सुमारे ६० ते ७० टक्के शेतकऱ्यांना मका व्यापाऱ्यांना १,१०० ते १,५०० रुपये प्रति क्विटल दराने विकावी लागली. त्यामुळे शासनाच्या हमीभावाच्या तुलनेत प्रति क्विटल ९०० ते १,३०० रुपयांपर्यंतचा तोटा शेतकऱ्यांना शासनाच्या चालढकल धोरणामुळे सहन करावा लागल्याचे चित्र आहे.
या पार्श्वभूमीवर शासनाने शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी तालुक्यातील सर्व खरेदी केंद्रांवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची मका शासनाने खरेदी करावी, अशी मागणी होत आहे.