

Sambhajinagar A thief who broke into a house was caught in Mukundwadi
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : घरात शिरलेल्या चोराला कुटुंबासह नागरिकांनी पकडले. ही घटना बुधवारी (दि.२८) रात्री सव्वादहाच्या सुमारास स्वराजनगर, मुकुंदवाडी येथे घडली. राज गमतीदास काळे (२४, रा. राजनगर, मुकुंदवाडी) असे पकडलेल्या चोराचे नाव आहे.
फिर्यादी चंद्रविलास बाबुलाल डिगर (३८, रा. स्वराजनगर) हे नमकीन विक्रीचा व्यवसाय करतात. बुधवारी (दि. २८) रात्री १० वाजेच्या सुमारास ते कुटुंबासह झोपलेले असताना त्यांच्या घराच्या गेटमधून काही तरी पडल्याचा मोठा आवाज आला. डिगर यांना जाग आल्यावर त्यांनी घराची पाहणी केली असता बाथरूममध्ये एक जण लपून बसल्याचे त्यांना दिसले. फिर्यादीने विचारपूस करण्याचा प्रयत्न केला असता चोरट्याने तेथून पळ काढला.
मात्र आरडाओरड झाल्याने परिसरातील नागरिकांनी पाठलाग करून त्याला दुसऱ्या गल्लीत पकडले. गल्लीतील दत्ता मखमले आणि अरुण भालेकर यांनी तातडीने ११२ नंबरवर कॉल करून पोलिसांना माहिती दिली. मुकुंदवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत काळेला ताब्यात घेतले.
त्याच्या झडतीत एक मोबाईल आणि एक बाजारू मंगळसूत्र मिळून आले. विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्याने हा माल इतर कोठूनतरी चोरल्याचा संशय व्यक्त होत आहे.
आरोपीने फिर्यादीला तक्रार केल्यास पाहून घेण्याची धमकीही दिली आहे. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास हवालदार नरसिंग पवार करत आहेत.