

Complete the work of the new zoo by December, orders Smart City CEO
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: स्मार्ट सिटी प्रशासन शहरवासीयांना नववर्षात नवे आंतरराष्ट्रीय दर्जाचे अद्ययावत प्राणिसंग्रहालय अर्थात झुलॉजिकल पार्क उपलब्ध करून देणार आहे. या प्राणिसंग्रहालयाचे काम येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण करा, असे आदेश बुधवारी (दि.१) महापालिका प्रशासक तथा स्मार्ट सिटी सीईओ जी. श्रीकांत यांनी अधिकाऱ्यांना दिले.
मिटमिटा येथे स्मार्ट सिटीच्या वतीने तयार करण्यात येत असलेल्या प्राणिसंग्रहालयाच्या कामाला आता गती मिळाली आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक व स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत यांनी बुधवारी प्राणिसंग्रहालयाच्या जा गेला भेट दिली. त्यांनी नव्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कामाचा प्राणिसंग्रहालयाच्या आढावा घेतला. त्यानंतर या परिसरातून शेतकऱ्यांसाठी स्मार्ट सिटीने तयार केलेल्या पोहोच रस्त्याच्या कामाची पाहणी केली. हे काम एका शेतकऱ्यामुळे रखडले होते.
शेतकऱ्याने आयुक्तांकडे निवेदन दिल्यानंतर त्यांनी संबंधित शेतकऱ्याशी चर्चा करून तोडगा काढला. त्यामुळे आता रस्त्याच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच दोन-तीन ठिकाणी रखडलेल्या संरक्षक भिंतीचे कामही आयुक्तांनी मार्ग काढल्यामुळे आता लवकरच पूर्ण होणार आहे. त्यानंतर लगेचच प्रकाश योजनेचे कामही जलद गतीने घेण्यात येणार आहे. डिसेंबरमध्ये सर्व स्थापत्य कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, सीएसआरमधून प्रवेशद्वाराचे काम करण्यात येणार आहे.
स्मार्ट सिटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जोगदंड, मनपाचे उद्यान अधीक्षक विजय पाटील, पशुधन विकास अधिकारी शेख शाहीद, नगर रचनाकार कौस्तुभ भावे, कनिष्ठ अभियंता राहुल मालखेडे, प्रकल्प व्यवस्थापक इसान खान, प्रकल्प व्यवस्थापक स्मार्ट सिटी स्नेहा नायर, किरण आढे, मीडिया अॅनालिस्ट अर्पिता शरद, एन्ड्यूरन्सचे प्रतिनिधी व कंत्राटदार उपस्थित होते. संबंधितांना काम वेळेत पूर्ण करण्यासाठी यावेळी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.