

Heavy rains destroy marigolds, decrease in arrivals for Dussehra
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : अतिवृष्टीमुळे फूल उत्पादक शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसल्याने दसऱ्याला झेंडूच्या फुलांची आवक घटली आहे. नवरात्रीच्या तोंडावर पावसाने झेंडूची झाडे-फुले चिंब भिजली. परिणामी, झेंडूच्या फुलांची मोठ्या प्रमाणात नासाडी होऊन आवक घटली आहे. यामुळे भावात तेजी आल्याने झेंडू प्रतिकिलो ६० ते १०० रुपये दराने विक्री सुरू होती. रात्रीतून फुलांची आवक झाली नाही तर भाव चढेच राहण्याची शक्यता आहे.
दसरा-दिवाळीला झेंडूच्या फुलांना अनन्यसाधारण महत्त्व असते. या दिवशी घरांवर, दुकानांवर झेंडूच्या फुलांची माळ लावली जाते. दुचाकी-चारचाकी वाहनांनाही झेडूंच्या फुलांचा हार घातला जातो. त्यामुळे झेंडूच्या फुलांना प्रचंड मागणी असते. गतवर्षी मोठ्या प्रमाणात झेंडूच्या फुलांची आवक झाली होती. यंदा मात्र जिल्ह्यासह सर्वदूर झालेल्या अतिवृष्टीमुळे उभी पिके आडवी झाली.
फूल उत्पादकांचेही पावसामुळे मोठे नुकसान केले. तोडणीला आलेल्या झेंडूच्या फुलांची नासाडी झाली. त्याचा परिणाम होऊन दसऱ्यासाठी दोन दिवसांत अवघे तीनशे क्विटल फुलांची आवक झाली. माल कमी आल्याने झेंडूला प्रतिक्विटल ४ ते ६ हजार रुपयांचा भाव मिळाला. किरकोळ बाज-ारात बारीक फुले ६० ते ८० रुपये, तर मोठी फुले ८० ते १०० रुपये किलो दराने विक्री सुरू होते. बुधवारी रात्रीपासून फुलांची आवक होण्याची शक्यता कमी आहे. गतवर्षपिक्षा यंदा फुले निम्मीच आल्याने भावही तेजीत राहतील, असे फूल व्यापारी लईक भाई यांनी सांगितले.
यंदा अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील झेंडूची नासाडी झाल्याने आवक घटली. दसऱ्यासाठी जिंतूर, हिंगोली, माजलगाव येथून माल आला. उच्च दर्जाची फुले कमी प्रमाणात आली. किरकोळ बाजारात पिवळा, भगवा झेंडू ५० ते ६० रुपये, तर मोठा झेंडू हार ८० रुपये दराने विक्री सुरू होती. असे फूल व्यापारी बाबासाहेब तांबे यांनी सांगितले.