

Complaints against Guardian Minister Sanjay Shirsat at Shiv Sena meeting
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शिव-सेनेच्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांची बैठक गुरुवारी (दि.७) पार पडली. यात मंत्री उदय सामंत यांच्यासमोर एका लोकप्रतिनिधीनेच पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याविरोधात तक्रारींचा पाढा वाचला. पालकमंत्र्यांना फोन उचलायला सांगा. ते आमदारांचेच फोन घेत नाहीत, कार्यकर्त्यांचे कधी घेत असतील, असेही यावेळी त्यांनी सुनावल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
शिवसेना नेते उदय सामंत आणि अर्जुन खोतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील एका हॉटेलमध्ये पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या ठिकाणी मंत्री सामंत आणि खोतकर यांनी सुरुवातीला जालना आणि नंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पक्ष संघटनच्या कार्याचा आढावा घेतला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या बैठकीला पालकमंत्री संजय शिरसाट आणि आमदार अब्दुल सत्तार वगळता जिल्ह्यातील पक्षाचे चार आमदार आणि शहर, जिल्हा आणि तालुक्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत सुरुवातीला लोकप्रतिनिधींनी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका व नगरपरिषद निवडणुकांबाबत भूमिका मांडली. तसेच या निवडणुकांसाठी पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याची ग्वाही दिली. यादरम्यान एका लोकप्रतिनिधीने पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या कार्यपद्धतीची तक्रार केली. पालकमंत्र्यांचे लोकांचे फोन घ्यायला सांगा, ते आमदारांचेच फोन घेत नाहीत. चार चार वेळा फोन करावे लागतात. कार्यकर्त्यांचे फोन कधी घेत असतील, असे त्यांनी नाराजीच्या सुरात नमूद केल्याचे सूत्रांनी सांगितले. यावेळी इतर काही पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनीही त्यांच्या वक्तव्याला माना हालवून प्रतिसाद दिला. त्यानंतर उदय सामंत यांनी बाजू सांभाळून घेत पक्ष संघटनवाढीसाठी आपल्याला एकदिलाने काम करायचे आहे, असे सांगितले. बैठकीला आमदार विलास भुमरे, रमेश बोरणारे, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार संजना जाधव, जिल्हा प्रमुख भरतसिंग राजपूत, राजेंद्र जंजाळ, नीलेश शिंदे आदी उपस्थित होते.
प्रत्येक जागा लढायची असे समजून कामाला लागा
मंत्री उदय सामंत यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्यादृष्टीने पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. आपल्याला प्रत्येक जागा लढायची, असे समजून तयारी करा. युतीबाबतचा निर्णय वरिष्ठ घेतील. नेत्यांच्या निवडणुका झाल्या, आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहे. कार्यकर्त्यांना केंद्रस्थानी ठेवून तयारी करा. संघटनात्मक बांधणी वाढवा, असेही उदय सामंत म्हणाले.
भाजप मोठा भाऊ, पण...
राज्यात अनेक ठिकाणी शिवसेनेच्या आमदारांविरोधातील प्रतिस्पर्धी भाजपात जात आहेत. त्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, भाजपबद्दल आम्हाला आदर आहे, भाजप आमचा मोठा भाऊ आहे. आता आमचे काही पूर्वाश्रमीचे विरोधक मित्र पक्ष भाजपचा आधार आहेत हे खरे असले तरी त्याबद्दल काळजी करण्याची गरज नाही. कारण आमचे सर्व आमदार, पदाधिकारी सक्षम आहेत. ते आतापर्यंत या सर्वांवर मात करूनच पुढे आ-लेले आहेत. आमच्या पूर्वाश्रमीच्या विरोधकांना पुरून उरण्याची क्षमता आमच्या त्या त्या ठिकाणच्या नेतृत्वात आहे, असे उदय सामंत यांनी बैठकीपूर्वी पत्रकारांशी बोलताना सांगितले.