

Clash at Kulaswamini Kala Kendra
पैठण, पुढारी वृत्तसेवा : पैठण तालुक्यातील धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील थापटी तांडा येथील बेकायदेशीर सुरू असलेल्या कुलस्वामिनी कला केंद्रात डीजेवर गाणे लावण्याच्या कारणावरून रविवारी (दि.३१) रात्री शाब्दिक चकमक होऊन कामगारांनी ग्राहकाला मारहाण केल्याची घटना घडली होती. याचा राग मनात धरून अज्ञात जमावाने सोमवारी सायंकाळी थापटी तांडा शिवारातील देवगाव फाटा या परिसरातील कुलस्वामिनी कला केंद्रात धुडगूस घालून केंद्रातील साहित्याची तोडफोड करीत येथील कामगारांना मारहाण केली. या मारहाणीत एकाला गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे.
धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून बेकायदेशीररीत्या कुलस्वामिनी कला केंद्र सुरू असून, या ठिकाणी यापूर्वी परिसरातील तब्बल पंधरा ते वीस गावांतील ग्रामस्थांसह ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी तालुका, जिल्हा व मंत्रालयापर्यंत हे कला केंद्राविरुध्द लेखी तक्रारी करून केंद्र बंद करण्याच्या मागणीसाठी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले होते. मात्र अद्याप हे केंद्र बंद झालेले नसून दररोज या केंद्रात सर्रासपणे हाय प्रोफाईल अश्लील पार्टीचे मोठ्या आवाजात डीजेच्या तालावर दररोज नाच गाण्याची आयोजन करण्यात येते.
शिवाय हे केंद्र परवानगी नसताना रात्रीपासून सकाळपर्यंत सुरू असते. रविवारी रात्री कला केंद्रात नाचगाण्याचा कार्यक्रम सुरू असताना बाहेरगावांहून आलेल्या ग्राहकाला केंद्रातील कामगाराने डीजेवर गाणे वाजविण्याच्या कारणावरून मारहाण करण्याची घटना घडली होती. याचा राग मनात धरून त्या वीस ते पंचवीस अज्ञात तरुण ग्राहकांनी रोडवर वाहने लावून अचानक जमाव जमवून कला केंद्रात धुडगूस घालून खुर्चा, सीसीटिव्ही कॅमेरे, खिडक्यांच्या काचा फोडून येथील कामगारांना मारहाण केली. यात बाबासाहेब कडुबा वाघुले हा गंभीर जखमी झाल्यामुळे अज्ञात तरुण घटनास्थळावरून तात्काळ पळून गेले. या घटनेमध्ये जखमीला पुढील उपचारासाठी पाचोड येथील शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले.
घटनेची माहिती पाचोड पोलीस ठाण्याचे सपोनि सचिन पंडित यांना मिळताच पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक शेषराव चव्हाण, बिट जमादार बाबूराव साबळे यांच्या पथकाला घटनास्थळी रवाना केले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत तक्रार दाखल करण्यासाठी तक्रारदार पोलिस ठाण्यात आलेले नव्हते.
या घटनेनंतर पाचोड पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी तात्काळ पाठविण्यात आले होते. प्राप्त माहितीनुसार सदरील कला केंद्रात झालेला प्रकार पैशाच्या व्यवहारातून झाला असल्याची माहिती पोलिस पथकाला मिळाली असून, अशी माहिती पाचोड पोलिस ठाण्याचे सपोनि सचिन पंडित यांनी दिली आहे.