

छत्रपती संभाजीनगर : सिडको पोलिस ठाण्याच्या विशेष पथकाने अवैध धंद्यांविरुद्ध मोहीम तीव केली आहे. गेल्या तीन दिवसांत आंबेडकरनगर परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून पोलिसांनी एकूण 1 लाख 18 हजार 560 रुपये किमतीची देशी दारू आणि विदेशी बिअर जप्त केली आहे. या प्रकरणी 5 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांनी दिली.
अधिक माहितीनुसार, मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी अवैध धंद्यांवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, रविवारी (दि.11) रात्री 8 वाजेच्या सुमारास गौतमनगर, आंबेडकरनगर येथे उपनिरीक्षक अनिल नाणेकर यांना एका घरात देशी दारूचा साठा असल्याची माहिती मिळताच छापा टाकला. तेथे 76 हजार 800 रुपये किमतीचे भिंगरी संत्राचे 20 बॉक्स (960 बाटल्या) मिळून आले.
हा साठा बाळू गणराज आणि आनंद रावसाहेब सदाशिवे (दोघेही रा. गौतमनगर, आंबेडकरनगर) यांनी विक्रीसाठी ठेवल्याचे तपासात समोर आल्याने दोघांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. ही कारवाई उपनिरीक्षक अनिल नाणेकर, सफौ सुभाष शेवाळे, हवालदार मंगेश पवार, अंमलदार सहदेव साबळे, विशाल सोनवणे, प्रदीप फरकाडे, अमोल अंभोरे यांच्या पथकाने केली.
बिअरचाही साठा जप्त, शॉपी मालकालाही केले आरोपी
9 जानेवारी रोजी रात्री 10:30 वाजता आंबेडकरनगर गल्ली नंबर 15 मध्ये मनोहर ऊर्फ मनू आदमाने याच्या घरात डी.बी. पथकाने छापा टाकला. तेथून 41 हजार 760 रुपये किमतीचे विविध कंपन्यांचे विदेशी बिअरचे 17 बॉक्स (204 बाटल्या) जप्त केले. या प्रकरणी विनोद सूर्यभान तुपे, मनोहर आदमाने (दोघे रा. आंबेडकरनगर) दोघांना अटक करण्यात आली, तर माल पुरविणाऱ्या मस्तानी बिअर शॉपीचा चालक राजूशेठ (रा. एन-7 सिडको) याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.