

छत्रपती संभाजीनगर : माझ्या भागात प्रचारासाठी यायचे नाही, त्यांना दादागिरी, दमदाटी करून हुसकावून लावणे असे प्रकार लोकशाहीमध्ये अजिबात खपवून घेतले जाणार नाही. जिन्सी, मिलकॉर्नर येथे राडा करणाऱ्यांचा पोलिसांनी योग्यप्रकारे पाहुणचार केला आहे. गरज पडली तर भररस्त्यात प्रसाद देण्यासही पोलिस मागेपुढे पाहणार नाहीत असा सज्जड इशारा पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिला आहे. इथे फक्त कायद्यानेच राज्य चालेल असेही त्यांनी स्पष्ट केले.
पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी शनिवारी (दि.10) माध्यमाशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, निवडणुका या शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस दल योग्य खबदारबारी घेत आहे. जिन्सी आणि मिलकॉर्नर भागात गोंधळ घालणाऱ्या आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे. प्रचार करण्यासाठी जाणाऱ्या उमेदवारांना कोणीही अडवणूक, दमदाटी, दादागिरी करत असेल तर हे खपवून घेतले जाणार नाही. त्यांचा योग्य प्रकारे पाहुणचार केला जाईल.
सोशल मीडियावरही सायबर पथक निगराणी ठेवत आहे. निवडणूक काळात 229 वादग््रास्त पोस्ट डिलीट केल्या आहेत. प्रक्षोभक पोस्ट करणाऱ्यांवर यापुढे थेट गुन्हे दाखल केले जाणार आहेत. गतवर्षभरात सायबरने 13 गुन्हे नोंद करून 680 पोस्ट डिलीट केल्याचेही पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी सांगितले.
निवडणूक शांततेत, भयमुक्त पार पडेल
क्रांती चौक, सिटी चौक, जिन्सी, बेगमपुरा या संवेदनशील भागातील सर्व पक्षीय उमेदवारांची आयुक्तालयात शनिवारी बैठक घेतली. पोलिस आयुक्तांनी सर्वांच्या अडचणी जाणून घेत काही सूचनाही केल्या. बैठकीला सुमारे 100 उमेदवार उपस्थित होते. निवडणुका निर्भयपणे आणि शांततेत पार पडतील, असे पोलिस आयुक्तांनी सर्वाना आश्वस्त केले. बैठकीला उपायुक्त रत्नाकर नवले, शर्मिष्ठा भोसले, एसीपी अशोक राजपूत,गजानन कल्याणकर, संभाजी पवार यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी हजर होते.
नामविस्तारदिनी पारंपरिक कार्यक्रमांना परवानगी
14 जानेवारीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा नामविस्तार दिनानिमित्त दरवर्षी राजकीय व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन होते. मात्र, यंदा महापालिका निवडणुकीची आचारसंहिता असल्याने प्रशासनांकडून विविध पक्षांची नुकतीच बैठक घेतली. यंदा केवळ पारंपरिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात येणार आहे. राजकीय पक्षांचे बॅनर अथवा प्रचार होईल असे कोणतेही कार्यक्रम होणार नाहीत. अटी शर्थींसह परवानगी दिली जाणार आहे. मतदारांना प्रलोभन मिळेल अशा कार्यक्रमांना, वस्तू, खाद्य वाटपाच्या राजकीय कार्यक्रमांना परवानगी नसणार आहे. विद्यापीठ गेटवर अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचाही तगडा बंदोबस्त राहणार असल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले.
मतदान केंद्रावर मोबाईल नेल्यास मनाई
निवडणूक नियमांनुसार, मतदान केंद्राच्या 100 मीटरच्या आत मोबाईल नेण्यास कोणालाही परवानगी नसेल. हा नियम उमेदवार आणि पदाधिकारी सर्वांनाच लागू आहे. त्यामुळे केंद्रावर तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांशी विनाकारण वाद घालू नये, अन्यथा थेट गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा उमेदवारांच्या बैठकीत पोलिस आयुक्तांनी दिला आहे.
निवडणुकीसाठी 7 हजार पोलिसांचा बंदोबस्त
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची तयारी सुरू झाली आहे. 15 जानेवारीला मतदान तर मतमोजणी 16 जानेवारीला होणार आहे. त्यादृष्टीने बाहेरून 3 हजार 500 पोलिस, एसआरपीएफ, होमगार्ड असा बंदोबस्त मागविण्यात आला आहे. शहर पोलिसांचा तेवढाच फौजफाटा असा 7 हजार पोलिस अधिकारी, कर्मचारी, सशस्त्र दलाचा बंदोबस्त निवडणुकीसाठी तैनात राहणार असल्याचे पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी सांगितले.