

छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली असतानाच निवडणूक आयोगाने मंगळवारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या प्रलंबित निवडणुकांची घोषणा केली. त्यानुसार मराठवाड्यातील आठपैकी छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या चार जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींसाठी 5 फेबुवारी रोजी मतदान होणार आहे. तर 7 फेबुवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित केले जाणार आहेत.
राज्यातील बारा जिल्हा परिषदांचा निवडणूक कार्यक्रम मंगळवारी (दि.13) निवडणूक आयोगाने जाहीर केला. उर्वरित जिल्हा परिषदांच्या निवडणुका आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेल्याने पुढील टप्प्यात जाहीर होणार आहे. मराठवाड्यात आठ जिल्हा परिषदा आणि या जिल्ह्यांमधील पंचायत समितींच्या निवडणुका प्रलंबित होत्या. त्यापैकी छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या चार जिल्ह्यांतील पंचायत समिती व जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत.
या जिल्हा परिषदा व पंचायत समितींसाठी 5 फेबुवारी रोजी मतदान होईल. त्यानंतर एका दिवसाच्या अंतराने म्हणजे 7 फेबुवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केले जातील. या निवडणुकीसाठी 16 जानेवारीपासूनच नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवार तयारी लागले आहेत.
जिल्हा परिषद - पंचायत समिती
छत्रपती संभाजीनगर - सोयगाव, सिल्लोड, कन्नड, फुलंबी, खुलताबाद, वैजापूर, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर, पैठण
परभणी - जिंतूर, परभणी, मानवत, सेलू, पाथरी, सोनपेठ, पूर्णा, पालम, गंगाखेड
धाराशिव - परांडा, भूम, वाशी, कळंब, धाराशिव, तुळजापूर, लोहारा, उमरगा
लातूर - अहमदपूर, जळकोट, उदगीर, चाकूर, रेणापूर, लातूर, शिरूर, देवणी, औसा, निलंगा