

Christian community vs Gopichand Padalkar
छत्रपती संभाजीनगर : ख्रिस्ती समाजाविरुद्ध गरळ ओकून दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करून द्वेष मुलक भावनेस प्रोत्साहन देणारे वक्तव्य केल्यामुळे आमदार गोपीचंद पडळकर यांचे विरुद्ध गुन्हा नोंदवावा, म्हणून छत्रपती संभाजीनगर येथील ख्रिस्ती कृती समिती चे अध्यक्ष विजय (गुड्डु) निकाळजे यांनी छावणी पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली होती. परंतु तक्रारीची दखल छावनी पोलीस स्टेशन प्रमुखांनी काहीच दखल घेतली नाही. म्हणुन शेवटी न्यायालयात त्यांनी विधिज्ञ मधुर अनिल गोलेगावकर यांचे मार्फत धाव घेतली.
तेव्हा न्यायालयाने सविस्तर म्हणणे ऐकल्यावर वरील निरीक्षण नोंदवत न्यायालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून लेखी म्हणणे मांडण्याच्या आदेश दिल्यामुळे खळबळ उडाली आहे. विधिज्ञ मधुर अनिल गोलेगावकर यांनी न्यायालयात प्रभावी पणे बाजू मांडली त्यांना विधिज्ञ सागर मडके यांनी विशेष सहाय्य केले.
या प्रकरणी अधिक माहिती अशी आहे की, आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली येथील रामनगर चौकात ख्रिस्ती समाजाविरुद्ध मन दुखावणारे वक्तव्य करून ख्रिस्ती समाजाच्या धर्मगुरू यांना जीवे मारण्याची धमकी देऊन 'ख्रिस्ती धर्मगुरूंचा सैराट करा', अशा शब्दांचा उल्लेख केला होता.
या प्रकरणी ख्रिस्ती कृती समितीचे अध्यक्ष विजय (गुड्डु) निकाळजे यांनी छावणी पोलीस स्टेशन येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात कलम १७५ (३), २२३, २२५ अन्वये लेखी तक्रार दि. ९ जुलै २०२५ रोजी दिली होती. परंतु, छावणी पोलीस स्टेशन येथे कसल्याही प्रकारची फौजदारी तक्रार नोंदवून घेतली नाही.
त्यामुळे या प्रकरणाची याचिका फौजदारी अर्ज न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात विधिज्ञ मधुर अनिल गोलेगावकर व त्यांना सहायक म्हणून विधिज्ञ सागर मडके यांच्या मार्फत दाखल केली. त्यावर निरीक्षण न्यायालयाने नोंदविले व स्पष्ट आदेश दिला की, अर्जदाराद्वारे दाखल करण्यात आलेले पुरावे आधारे प्रथम दर्शनी गैर अर्जदार गोपीचंद पडळकर यांचे वक्तव्य दोन समाजात तेढ निर्माण करणारे असल्याचे जाणवते. ख्रिस्ती कृती समितीचे अध्यक्ष विजय (गुड्डु) निकाळजे यांची बाजू ग्राह्य धरून वरील प्रमाणे आदेश दिले आहे.