

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : वाळूज ते पुणे या महामार्गावर ठिकठिकाणी खड्डेच खड्डे झाल्याने अतिशय दयनीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती होत नाही, तोपर्यंत जडवाहनांची टोल वसुली थांबविण्यात यावी, असे पत्र सोमवारी (दि. २७) एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांना पाठविले आहे.
छत्रपती संभाजीनगर ते पुणे या महामार्गावरील रस्त्यांची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांकडून नियमितपणे टोल वसुली केली जात आहे. परंतु, रस्त्याच्या दुरुस्तीकडे शासनाचे सपशेल दुर्लक्षच होत आहे. या रस्त्याच्या दयनीय स्थितीमुळे आज संभाजीनगर ते पुणे जाण्यासाठी तब्बल सात ते आठ तासांचा अवधी लागत आहे. केवळ रस्त्याच्या दुरवस्थेमुळेच ही स्थिती आहे.
या रस्त्याबाबत सतत मीडियावरून टीका होत आहे. सोशल वाहनधारकांसह प्रवाशांतूनही ओरड होत आहे. मात्र, त्यानंतरही रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्षच केले जात आहे. खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होत आहे. तसेच इंधनाचा अपव्यय वाढला आहे असून अपघाताच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती होईपर्यंत टोल वसुली थांबविण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे माजी खासदार जलील यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडे केली आहे.