

Child dies after falling into water tank in front of house
सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा :
घरासमोरील पाण्याच्या हौदात पडून एका साडेचार वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील रहिमाबाद येथे शुक्रवारी (दि. ४) दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. या घटनेची सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
कार्तिक भगवान मोरे असे मुलाचे नाव आहे. भगवान मोरे हे कुटुंबासह शेतात राहतात. त्यांच्या घरासमोर पाण्याचा हौद आहे. दुपारी आई-वडील शेतात काम करत होते. तर कार्तिक घरासमोर खेळत होता. या दरम्यान कार्तिक पाण्याच्या हौदावर चढला व तोल जाऊन पडला.
यात त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही बाब लक्षात येताच त्याला तातडीने हौदाबाहेर काढून त्याच्या काकासह शेजाऱ्यांनी सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात आणले. मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून मृत असल्याचे घोषित केले. घटनेचा पुढील तपास बिट जमादार सचिन काळे करीत आहेत.
आठवडाभरात पाण्यात बुडून चिमुकल्याच्या मृत्यूची ही दुसरी घटना आहे. २६ जूनला तालुक्यातील मोढा बु. येथे घरासमोरील साचलेल्या पाण्यात बुडून सख्ख्या बहीण-भावाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेला आठवडा होत नाही, तर ही दुसरी घटना घडली. सध्या पावसाळा सुरू असून नदी-नाले, डबके पाण्याने साचत आहे. यामुळे पालकांनी लहान मुलांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.