Chatrapati Sambhajinagar fire
याच गोदामाला भीषण आग लागली होती. pudhari photo

Chatrapati Sambhajinagar fire : चिकलठाण्यात अग्नितांडव; मंडप डेकोरेशनचे गोदाम भस्मसात

सिलिंडरच्या स्फोटाने आगीचा भडका, तीन घरांना विळखा
Published on

छत्रपती संभाजीनगर : एकीकडे धूलिवंदनचा उत्साह सुरू असताना चिकलठाणा भागातील हिनानगरमध्ये मंडप डेकोरेशनच्या भव्य गोदामाला अचानक आगीचा भडका उडाला. ही घटना मंगळवारी (दि.3) दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास घडली. अग्नितांडवात गोदाम जळून खाक झालेच शिवाय शेजारील तीन घरांनाही या आगीने आपल्या विळख्यात घेतले.

या आगीत एका घराचा गॅस सिलिंडर फुटल्याने आगीचा भडका अधिकच वाढला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र तीन कुटुंबांचा संसार उघड्यावर आला आहे. अग्निशमनचे 5 बंब घटनास्थळी दाखल झाले होते. जवानांनी चार तास परिश्रम घेऊन आग आटोक्यात आणली. एमआयडीसी सिडको पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

Chatrapati Sambhajinagar fire
GST enforcement : थकीत जीएसटीसाठी व्यापाऱ्याची मालमत्ता जप्त

अग्निशमनने दिलेल्या माहितीनुसार, जालना रोडवरील हिनानगर येथील सोहम पार्क भागात 120 बाय 60 फूट आकाराचे मंडप डेकोरेशनवाल्याचे भव्य पत्राचे गोदाम आहे. त्यामध्ये सोफा, खुर्च्या, कपडा, सजावटीच्या महागड्या वस्तू असे साहित्य ठेवलेले होते. या गोदामाला दुपारी अचानक आग लागली. या गोदामातून आगीचे लोळ बाहेर येऊ लागले.

गोदामात कापडी पडदे, लाकडी वस्तू आणि इतर ज्वलनशील साहित्य असल्याने आगीने काही मिनिटांतच भीषण रूप धारण केले. आजूबाजूच्या घराना आगीने वेढा घातला. अग्निशमनला कळविण्यात आले. मुख्य अग्निशमन अधिकारी ए. एन. खांडेकर, उप अग्निशमन अधिकारी, विनायक कदम, ड्यूटी अधिकारी एस. बी. होळंबे, एच. वाय. घुगे, संजय कुलकर्णी, वैभव बागडे, अशोक वेलदोडे, जवान पदमपुरा व सिडको पथक सय्यद, राजू राठोड, विलास झरे, प्रवीण पचलोरे, आनंद भारसाखळे, साई बोरुडे, कृष्ण भागवत, रतन बहुरे यांनी सुमारे चार ते पाच तास परिश्रम घेऊन आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत गोदाम व बाजूची तीन घरे आगीच्या भक्षस्थानी पडली होती. नागरिकांनी प्रसंगावधान राखल्याने मोठी जीवितहानी टळली आहे.

Chatrapati Sambhajinagar fire
Fuel shortage rumor Jalna : शहरात इंधन टंचाईच्या अफवेने पेट्रोल पंपांसमोर रांगा

तिघांचे संसार आले उघडल्यावर

आगीची झळ शेजारीच असलेल्या मोहम्मद परवेज, नाजीम पठाण आणि शेख सिराज या तिघांच्या घरांना बसली. आग पसरत असतानाच एका घरातील गॅस सिलिंडरचा मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे आगीचा भडका उडाला. स्फोटानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. या अग्नितांडवात तिघांच्या घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य, मौल्यवान वस्तू सर्वकाही जळून खाक झाल्याने तिघांचे संसार उघड्यावर आले. कुटुंबियांना अश्रू अनावर झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news