

जालना : जालना शहरात पेट्रोल संपणार किंवा महागणार अशी अफवा सोशल मीडियावर वेगाने पसरल्याने 3 मार्चच्या संध्याकाळपासून शहरासह जिल्ह्यातील विविध पेट्रोलपंपांवर वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पहावयास मिळाले. काही पंपांवर अवघ्या काही तासांतच साठा संपल्याने नो स्टॉकचे फलकही लावण्यात आले.
शहरात सोशल मीडियावर पेट्रोलचे भाव वाढणार तसेच टंचाई होणार असल्याची चुकीची माहिती पसरवण्यात आली होती. परिणामी स्थानिकांनी पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा लावत गर्दी केली.अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केल्याच्या बातम्यांमुळे पेट्रोल महागणार तसेच टंचाई होणार या भीतीने वाहनधारकांनी पंपांवर गर्दी केली.
काही नागरिक तर बाटल्या आणि कॅन घेऊन पेट्रोल भरण्यासाठी पंपावर पोहोचले. मागणी वाढल्याने काही पेट्रोल पंपावर नो स्टॉकचे बोर्ड लावण्यात आले.
युद्धाचे पडसाद
युद्धाच्या भीतीपोटी इंधन साठा संपणार या अफवेने वाहनधारक धास्तावले आहेत. या पार्श्वभूमीवर गरज नसताना अनेक वाहनचालक गरजेपेक्षा जास्त पेट्रोल व डिझेल खरेदी करीत असल्याचे पहावयास मिळत आहे.