

Demanded Rs 10 lakhs, doubting character
केज पुढारी वृत्तसेवा : लग्नानंतर नव्याचे नऊ दिवस संपण्यापूर्वी अवघ्या दहा दिवसांनंतरच एका विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेत तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करून तिला दहा लाखांची मागणी करीत नवविवाहितेची माहेरी रवानगी केली.
या बाबतची माहिती अशी की, २९ जून २०२४ रोजी केज तालुक्यातील बनसारोळा येथील शुभांगी हिचे कानडी माळी येथील धरणीधर राऊत यांच्या सोबत हिंदू रितीरिवाजाप्रमाणे लग्न झाले. लग्ना नंतर तिला अवघे आठ दिवस चांगले नांदवले. त्या नंतर ११ जुलै रोजी तिला पुणे येथे नंणदेच्या घरी घेऊन गेले.
तेथे तिचा नवरा धरणीधर दतु राऊत, नणंद शुभांगी दत्तात्रय म्हेत्रे, नंदावे दत्तात्रय शंकर म्हेत्रे आणि सासरा दतु सखाराम राऊत यांनी तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्या वडिलाने लग्नात हुंडा दिला नाही. या कारणावरून शिवीगाळ करून मारहाण केली.
तसेच माहेरहून तुझ्या बापाकडून दहा लाख रुपये आणले शिवाय तुला नांदणार नाही, असे म्हणून सतत मानसिक व शारीरिक छळ करून त्रास दिला. एवढ्यावरच हे थांबले नाही तर माहेराहून दहा लाख रुपये घेऊन आल्याशिवाय तुला नांदवणार नाही असे म्हणून घरातून बाहेर काढले.
या प्रकरणी शुभांगी राऊत हिच्या तक्रारीवरून युसुफ वडगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारी वरून तिचा नवरा धरणीधर दतु राऊत, नणंद शुभांगी दत्तात्रय म्हेत्रे, नंदावे दत्तात्रय शंकर म्हेत्रे आणि सासरा दतु सखाराम राऊत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान अद्यापही एकही आरोपीस पोलिसांनी अटक केली नाही हे विशेष ! युसुफ वडगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस कॉन्स्टेबल बेबी गांधले या तपास करीत आहेत.