

छत्रपती संभाजीनगर : नगरसेवक अपात्रतेच्या तक्रारींच्या सुनावणीचे वेळापत्रक पुन्हा विस्कटले आहे. दुसऱ्या टप्प्यातील सुनावणी ५ ऑक्टोबरपासून सुरू होणार होती. मात्र, महापालिका आयुक्त अमोल येडगे अभ्यासदौऱ्यासाठी परदेशात गेल्याने नियोजित सुनावणी पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे ३८ तक्रारींच्या पुढील सुनावणीसाठी आता आयुक्तांच्या परतीची आणि नव्या तारखेची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
महापालिकेतील ११५ नगरसेवकांपैकी २५ जणांविरोधात दोनपेक्षा अधिक अपत्ये, अतिक्रमण, अनधिकृत बांधकाम तसेच अतिक्रमणाला प्रोत्साहन दिल्याच्या आरोपांवरून अपात्रतेच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम १० (१) (ड) अन्वये दाखल झालेल्या ३८ तक्रारींवर मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे.
पहिल्या टप्प्यात २७ प्रकरणांवर सुनावणी पार पडली. सुनावणीदरम्यान काही नगरसेवक आणि तक्रारदारांनी आपली बाजू सविस्तर मांडण्यासाठी तसेच आवश्यक कागदपत्रे करण्यासाठी अतिरिक्त वेळ मागितला होता. त्यानुसार त्यांना मुदत देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात उर्वरित प्रकरणांतील तक्रारदार आणि संबंधित नगरसेवकांना म्हणणे मांडण्याची संधी मिळणार होती. मात्र, आयुक्त येडगे हे अभ्यासदौऱ्यासाठी परदेशात गेले असल्याने ५ ऑक्टोबरची सुनावणी होऊ शकली नाही.
ग्लास्गोत सीईओ राउंड टेबल
महापालिकांच्या पाणी आणि सांडपाणी व्यवस्थापनात डिजिटल सुधारणा करून ही व्यवस्था अधिक सक्षम, आर्थिकदृष्ट्या शाश्वत आणि गुंतवणुकीसाठी योग्य बनविण्याच्या विषयावर जागतिक बँकेच्या वतीने ग्लास्गो, यूके येथे सीईओ राउंड टेबल आयोजित करण्यात आले आहे. या अभ्यासदौऱ्यासाठी आयुक्त अमोल येडगे ४ ऑक्टोबर रोजी रवाना झाले. त्यांच्या अनुपस्थितीत अपात्रता प्रकरणांची सुनावणी होऊ शकत नसल्याने नियोजित सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आयुक्त परतल्यानंतर पुढील सुनावणीची तारीख निश्चित केली जाण्याची शक्यता आहे.
३८ तक्रारी, २५ नगरसेवक
महापालिकेतील ११५ नगरसेवकांपैकी २५ नगरसेवकांविरोधात एकूण ३८ अपात्रतेच्या तक्रारी दाखल आहेत. त्यापैकी २७ प्रकरणांवर पहिल्या टप्प्यात सुनावणी झाली आहे. उर्वरित प्रकरणांवरील दुसऱ्या टप्प्यातील सुनावणी आयुक्तांच्या परदेश दौऱ्यामुळे पुढे ढकलण्यात आली असून, नव्या तारखेकडे संबंधितांचे लक्ष लागले आहे.