Sambhajinagar Crime : १३ वर्षे तपासात दिरंगाई, ५० तक्रारी, तरीही न्याय नाही; फिनिक्स क्लासेसच्या संचालकाने जीवन संपवले

मालमत्तेच्या खरेदीतील फसवणूक, घरावर आलेल्या जप्तीच्या कारवाईमुळे नैराश्य ३ पानी सुसाईड नोटमधून पोलिस अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर गंभीर आरोप, चौघांवर गुन्हा दाखल
property fraud case
मोहन कोरडे यांनी विष प्राशन केल्यानंतर जवळील हॉटेलचे कामगार त्यांना पोलिसांच्या मदतीने रुग्णालयात घेऊन जाताना.pudhari photo
Published on: 
Updated on: 

छत्रपती संभाजीनगर : मालमत्तेच्या खरेदी-विक्रीतील फसवणूक, पोलिसांच्या तपासातील १३ वर्षांची दिरंगाई, जाणीवपूर्वक केलेली बदनामी आणि उदरनिर्वाहाचे साधन हिरावले गेल्याने राहत्या घरावर आलेल्या जप्तीच्या कारवाईला कंटाळून फिनिक्स इंग्लिश स्पीकिंग क्लासचे संचालक मोहन शिवराम कोरडे (६०, रा. द्वारकापुरी, उस्मानपुरा) यांनी विष प्राशन करून जीवनयात्रा संपवली.

विष प्राशन केल्यानंतर त्यांनी स्वतःच ११२ क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना याची माहिती दिली. याप्रकरणी त्यांच्या पत्नी सुनीता कोरडे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विजय रामचंद्र सांगवीकर (रा. श्रेयनगर), सुधा प्रभाकर साने (रा. भडकलगेट), उद्वव राऊत आणि संतोष जाधव (दोघे रा. छत्रपती संभाजीनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या चार आरोपींची नावे आहेत.

property fraud case
Chhatrapati Sambhajinagar investment : लुब्रिझोलच्या एक्झिटमुळे रिक्त भूखंडावर पाच कंपन्यांकडून गुंतवणूक

अधिक माहितीनुसार, मंगळवारी (दि. ६) दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास ग्रीन लिफ हॉटेल येथील क्लासच्या रूममध्ये मोहन कोरडे यांनी विष प्राशन केले. विष घेतल्यानंतर त्यांनी स्वतः ११२ वर कॉल करून पोलिसांना माहिती दिली.

हॉटेल मालकानेही तत्परता दाखवत पोलिसांच्या मदतीने त्यांना चिकलठाणा येथील मिनी घाटी रुग्णालयात दाखल केले. अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना बुधवारी (दि.७) पहाटे साडेचार वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा असा परिवार असून, त्यांचा मुलगा बंगळुरू येथे कायद्याचे शिक्षण घेत आहे.

जागेचा व्यवहार आणि फसवणुकीची सुरुवात

मोहन कोरडे आणि त्यांच्या पत्नी २००१ पासून शहरात इंग्रजी शिकवणी घेत होते. २००३ मध्ये त्यांनी आरोपी विजय सांगवीकर आणि सुधा साने यांच्याकडून सिडको एन-१ मधील तापडिया सिने मार्केटमध्ये तीन दुकाने (७,८,९) भाड्याने घेतली होती.

२००६ मध्ये ती दुकाने कायमस्वरूपी विकत घेण्याचा करार झाला आणि त्यासाठी त्यांनी ७ लाख ५० हजार रुपये रोख स्वरूपात टप्प्याटप्प्याने दिले. मात्र, पूर्ण पैसे घेऊनही आरोपींनी दुकाने नावावर केली नाहीत, उलट खोटे बॉण्ड बनवून त्यांची फसवणूक केली. या प्रकरणी २०११ पासून न्यायालयात खटला सुरू आहे.

property fraud case
Chhatrapati Sambhajinagar crime : चलती क्‍या? म्‍हणत तरुणीचा भररस्‍त्‍यात विनयभंग

तपास सुरू होताच आरोपींचा जामीन अन् सुरू झाली बदनामी

१३ वर्षे पोलिसांकडून कोणतीही कारवाई न झाल्याने मोहन कोरडे यांनी २०२५ मध्ये उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने सखोल तपासाचे आदेश दिल्यानंतर जुलै २०२६ मध्ये तपास अधिकारी भरत पाचोळे यांनी साक्षीदारांचे जबाब नोंदवून आरोपींना चौकशीसाठी बोलावले.

अटकेच्या भीतीने आरोपी विजय सांगवीकर आणि सुधा साने यांनी उच्च न्यायालयात धाव घेत २१ जुलै रोजी अटी व शर्तीसह अंतरीम जामीन मिळवला. जामिनावर बाहेर राहिल्याने आरोपींनी कोरडे दाम्पत्याची सर्वत्र बदनामी सुरू केली. माजलगाव आणि महापालिकेच्या शाळांमध्ये सुरू केलेले शिकवणी वर्ग आरोपींनी हे पती-पत्नी फ्रॉड आहेत असे सांगून बंद पाडले.

पोलिसांचा हलगर्जीपणा आणि १३ वर्षे रखडलेली फाईल

२००६ मधील या फसवणूक प्रकरणात न्यायालयाच्या आदेशाने २०१२ मध्ये एम-केस दाखल होऊन पहिला गुन्हा नोंदवण्यात आला होता. परंतु, तत्कालीन तपास अधिकारी पीएसआय खोड (के.एस.) आणि तत्कालीन पोलिस निरीक्षक नामदेव ठोंबरे यांनी साधे दोषारोपपत्रही दाखल केले नाही. न्याय मिळवण्यासाठी कोरडे यांनी २००६ ते २०२५ या काळात ५० तक्रार अर्ज दिले, मुंबईतील आझाद मैदानावर दोन वेळा आमरण उपोषण केले. राज्याचे मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांकडून आदेश येऊनही स्थानिक पातळीवर कोणतीही कारवाई झाली नाही, असा उल्लेख कोरडे यांनी आपल्या ३ पानी आत्महत्येच्या निवेदनात केला आहे.

कर्जाचे आमिष आणि घरावरील जप्तीची कारवाई

याच काळात मोहन कोरडे यांना अर्धांगवायूचा झटका आला आणि त्यांच्या मुलाचाही अपघात झाला. उदरनिर्वाहाचे साधन थांबल्याने त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली. त्यांच्या उस्मानपुरा येथील राहत्या घरावर पंजाब नॅशनल बँकेचे १६ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज थकीत होते. हे घर वाचवण्यासाठी उद्धव राऊत आणि संतोष जाधव यांनी ५० लाखांच्या कर्जाचे आमिष दाखवून कोरडे यांच्याकडून २ बाँड आणि ५ कोरे धनादेश (चेक) घेतले व प्रत्यक्ष कर्ज न देता फसवणूक केली. अखेर बँकेने कारवाई करत घरावर जप्तीची नोटीस बजावली. दुर्दैवाने ६ ऑक्टोबर रोजीच जप्तीची अंतिम कारवाई होणार होती.

मृत्यूनंतर तरी कारवाईची आर्त विनंती

आयुष्यभराची कमाई आणि डोक्यावरचे छत हिरावले जाणार, तसेच पोलिसांच्या १३ वर्षांच्या दिरंगाईमुळे न्याय मिळण्याची आशा पूर्णपणे मावळल्याने ६ ऑक्टोबर रोजी कोरडे यांनी मृत्यूला कवटाळले. मृत्यूनंतर तरी या सर्व प्रकरणांची क्राइम ब्रांच किंवा एसआयटी मार्फत एकत्रित उच्चस्तरीय चौकशी करावी, दोषी आरोपींसह संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि न्याय मिळेपर्यंत घराच्या लिलावाला स्थगिती द्यावी, अशी आर्त विनंती त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या निवेदनात केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news